Fight on farm contour शेतीच्या बांदावरून हाणामाऱ्या


शेतीच्या बांदावरून हाणामाऱ्या
     नुकतीच पावसाला सुरूवात झाली आहे. उन्हाळयामध्ये शेतकऱ्यांनी शेतीची मशागत अगोदरच करून ठेवली होती. थोडेफार शिल्लक राहिलेले कामे जुनच्या पहिल्या आठवडयात पूर्ण झाली. तसा शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहू लागला. यावेळेस कोरोनाचा कहर असल्यामुळे शेतकऱ्यांची बरीच कामे बाकी होती. तरीपण लगबगीने त्यांनी ती पूर्ण केली. हवामान खात्याने भाकित केले की यावर्षी 99 % पाउस पडणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण तयार झाले मात्र ते फार काळ टिकून राहू शकले नाही. कारण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जुनच्या सुरूवातीला थोडा फार पाउस झाला. शेतकऱ्यांना वाटले की हवामान खात्याचा यावर्षीचा अंदाज खरा आहे. आणि शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात केली.
   पेरणीला सुरूवात आणि डोकेफोडी:      
     पेरणीला सुरूवात करतांना अनेक महाभाग स्वत: च्या शेताला लागून असलेल्या दुसऱ्याच्या शेताचे धुरे कोरतात आणि विनाकारण ऐकमेकांची डोके फोडून घेतात. कारण काय तर एक - दोन तास दुसऱ्याच्या शेतात पेरणे. एक - दोन तास पेरल्याने फार मोठे उत्पन्न होईल अशातला प्रकार नाही. बाकीची बरीच शेती पडीत राहिल पण दुसऱ्याच्या धुरा कोरायचा आणि वाद ओढवून घ्यायचा ही हावरट माणसीकता घेवून अनेक महाभाग दरवर्षी अशा भानगडी करीत असतात. लागून असलेले शेत हे एकतर भावाचे असते नाहीतर भाउबंदाचे असते.
  मानवाचा इतिहास आक्रमनाचा: 
       मानवाचा इतिहास हा मुळातच हेवेदावे, आक्रमण, शोषण, कुरघोडी आणि युध्द याचा राहिलेला आहे. हिटलर सारख्या सत्तापिपासू हुकूमशहाने संपूर्ण जर्मनीला युध्दाच्या खाईत लोटले होते कारण काय तर त्याला जर्मनीच्या सिमा विस्तारायच्या होत्या. चीन, अमेरिका, पाकिस्तान, कोरीया हया राष्ट्रांच्या प्रमुखांनाही तेच करायचे आहे. म्हणून अनेक देशांच्या सिमेवर घुसखोऱ्या, हाणामाऱ्या सुरू असतात. भारत आणि चीन दरम्यान तेच झाले आणि 20 जवानांचा नाहक बळी गेला.
  कोर्ट कचेऱ्या आणि तुरूंगवास:
     सत्ताधिशांना देशाच्या सिमा वाढवायच्या आहेत. आणि शेतकऱ्यांना स्वत: च्या शेताच्या सिमा वाढवायच्या आहेत. याचा परिणाम काय होणार हे समजून घेणे गरजेचे आहे. अनेक हुकूमशहांना स्वत: आत्महत्त्या करावी लागली नाही तर दुसऱ्यांनी त्याला चिरडून मारले.  शेतकऱ्यांनी इतिहासाकडू समज घ्यावा की, दुसऱ्यांच्या शेतीवर आक्रमण करणे, धुरे फोडणे यासारख्या कारणामुळे भांडण आणि द्वेष याशिवाय दुसरे काहीही उत्पन्न होणार नाही. भांडणामध्ये हाणामारी होते. एखादयाचा जीव जातो. कुटूंब उध्वस्त होतात. आणि त्यानंतर ज्याने हे केले त्याच्या भोवती कोर्ट कचेऱ्या आणि एक - दोन तास पेरण्यासाठी आजन्म तुरूंगवास. यातून दोन्हीही कुटूंबे उध्वस्त. हया गोष्टी सध्या ग्रामिण भागामध्ये मोठया प्रमाणात घडत आहे. साध्या साध्या वादामधून एकमेकांचे सख्खे भाउ पक्के वैरी झालेत.
    उपाययोजना:
     एकमेकांची धुरे फोडून डोके फोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर येवू नये. कोणतेही दु:ख आहे ते निर्माण होण्यामागे कारण आहे आणि ते कारण जर नष्ट केले तर दु:ख नष्ट करता येते. असे तथागत बुध्दांनी सांगीतले आहे. यासाठी कारणांचा शोध घेवून खालील काही उपाययोजना करता येईल.
1. शेतीवरून कोणताही वाद झाला तरी भांडण करायचे नाही हे शेतकऱ्यांनी पक्के मनात ठरवावे.
2. शेतीच्या धुऱ्यावरून निर्माण झालेले वाद सामोपचाराने मिटविणे.
3. गावातील प्रतिष्ठीत, न्यायाची बाजू घेणाऱ्या व्यक्तीकडून हा वाद मिटवता येईल का? ते पहावे.
5. शेतीतील भांडणे मिटवण्यासाठी कायदयाचा आधार घ्यावा.
6. वरील सर्व उपाय करूनही प्रश्न सुटत नसेल तर शेवटचा उपाय म्हणून न्यायालयाकडे धाव घ्यावी.  

Post a Comment

0 Comments