Contribution of Chatrapati Shahu Maharaj in Social Change छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक परिवर्तणातील योगदान


Contribution of Chatrapati Shahu Maharaj in Social Change छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक परिवर्तणातील योगदान

     सामाजिक क्रांतीचे अग्रदुत म्हणून छत्रपती शाहू महाराज यांना संपूर्ण भारतामध्ये ओळखले जाते. शाहू महाराज बोलके सुधारक नव्हते तर ते कर्ते सुधारक होते. त्यांनी आपले गुरू महात्मा जोतिराव फुले यांचा वारसा डोळयासमोर ठेवून आपल्या करवीर संस्थानामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायावर आधारीत असलेल्या राज्याची स्थापना केली. आणि आपल्या संस्थानातील प्रस्तापितांचे वर्चस्व मोडीत काढून 50% आरक्षण मागास जातीतील लोकांसाठी लागू केले. त्यामुळे त्यांना टिळकांसारख्या अनेक प्रस्तापित नेत्यांचा रोष पत्करावा लागला परंतू त्यांना त्यांनी भिक घातली नाही. शाहू महाराज जसे धिप्पाड शरीरयस्टीचे होते तसेच त्यांचे मनही मोठे होते म्हणून तर त्यांनी हजारो वर्षापासून सुरू असलेली अस्पृश्यता, सामाजिक विषमता एका दणक्यात नष्ट करून टाकली. आणि सामाजिक न्यायाची स्थापना केली.

     अशा या महान राजाचा जन्म कोल्हापूर जिल्हयातील कागल या गावी घाटगे कुटूंबात 26 जुन 1874 मध्ये     झाला. त्यांच्या वडीलांचे नाव जयसिंगराव घाटगे होते. कोल्हापुरचे राजे शिवाजी चौथे यांच्या विध्वापत्नी राणी आनंदीबाई यांनी यशवंतला दत्तक घेतले. त्यांनतर त्यांचे प्राथमिक शिक्षण राजकोट येथे झाले आणि पुढील शिक्षण सर स्टुअर्ट फ्रेजर या अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण झाले. शाहू महाराजांना शिक्षणासोबत कुस्तीमध्येही प्रचंड आवड होती. म्हणून त्यांनी आपल्या संस्थानात अनेक ठिकाणी कुस्तीची आखाडे सुरू केल्याचे दिसते. शाहू महाराजांच्या जीवनामध्ये अनेक असे प्रसंग आले की त्यातून त्यांना सामाजिक सुधारणा करण्यास भाग पाडले.

वेदोक्त प्रकरण:

     1899 च्या नोव्हेंबर महिण्यात कार्तिक मासामध्ये शाहू महाराज पंचगंगा नदीत स्नान करण्यासाठी दररोज जात होते. राजाच्या स्नानाच्या वेळी मंत्र उच्चारण्याची परंपरा होती. दररोज नारायण भटजी अंधोळ करता पुराणोक्त मंत्र म्हणत असे. एके दिवसी महाराजाबरोबर मुंबईचे बंडखोर राजारामशास्त्री भागवत हे होते. नारायण भट हा पुराणोक्त मंत्र म्हणत असल्याचे  राजाराम शास्त्रीच्या लक्षात आले. त्यांनी महाराजांना ही हकीकत सांगितली. महाराजांनी नारायण भटाला विचारले की, तु हे पुराणोक्त मंत्र का म्हणत आहे. भट म्हणाला महाराज शुद्रांसाठी पुराणोक्तच मंत्र म्हणावे लागतात. वैदिक मंत्र म्हणण्यासाठी स्नानाची आवश्यकता असते. मात्र शुद्रांसाठी पुराणोक्त मंत्र म्हणतांना स्नानाची आवश्यकता नसते. असे भटजीने सांगितले. महाराजांना प्रचंड राग आला माझ्यासोबत जर हे लोक असे वागत असतील तर सामान्यांचे काय? याची जाणीव महाराजांना झाली आणि नंतर त्यांनी प्रस्तापितांची मक्तेदारी नष्ट करण्यास सुरूवात केली. त्यांनी भडजीला नोकरीवरून हाकलून दिले. त्यांनतर नारायण भटाची बाजू घेवून टिळकांनी केसरीमधून महाराजांवर टिकेची झोड उठविली मात्र त्याला शाहू महाराज घाबरले नाही.

गंगाराम कांबळे प्रकरण:

     गंगाराम कांबळे घोडयाच्या तबेल्यात घोडयाची स्वच्छता करण्यासाठी कामाला होता. एकदा काम करतांना गंगाराम कांबळेला तहाण लागली त्याने तबेल्यातील घोडयांना पाणी पाजायच्या हौदातील पाणी पिले. हे संस्थानातील उच्च जातीच्या कर्मचाऱ्यांनी पाहिले. सर्व कर्मचारी धावत आले एका अस्पृश्याने हौद बाटवला म्हणून त्याला बेदम मारहान करण्यात आली. त्यानंतर त्याला महाराजांकडे नेण्यात आले. गंगाराम मारहाणीत अर्ध मेला झाला होता. त्याची अवस्था महाराजांनी पाहिली त्यांना अतिशय वाईट वाटले ज्यांनी ही अवस्था केली त्यांना आपल्या कमरेच्या पटटयाने फोडून काढले. मात्र प्रकरण इथे थांबले नाही. त्यानंतर गंगाराम कांबळेला इतर कर्मचारी द्वेषभावनेने वागवू लागले. तेंव्हा महाराजांनी कोल्हापुरच्या चौकात त्याला चहाची हॉटेल टाकून दिली आणि महाराज रोज सकाळी 10 वाजता आपल्या लवाजम्यासह हॉटेलवर जावून चहा पिवू लागले. संस्थानामध्ये आदेश काढला की, ज्यांना सरकारी कामे करायची असेल त्यांनी सकाळी 10 वाजता चौकात यावे महाराज तीथे दररोज उपस्थित असतात. अशाप्रकारे अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी शाहू महाराजांनी उपाय केले.

शेती प्रश्न:

     शाहू महाराजांनी शेतीसंबंधी केलेले कार्य आजच्याही राज्यकर्त्यांना लाजवेल असेच होते. शेतीची प्रगती झाल्याशिवाय संस्थानाची प्रगती होणार नाही. त्यासाठी त्यांनी राधानगरी धरणासारख्या मोठ मोठया धरणांची आणी कालव्यांची निर्मिती केली. शेतीवर आधारीत उद्योगधंदे उभारणीसाठी अनेक लोकांना मदत केली. संस्थानातील संपूर्ण शेती पाण्याखाली आणली.

आरक्षणाची सुरूवात:

     देशातील शाहू महाराज हे पहिले राजे आहेत. त्यांनी मागास जातीसाठी आपल्या संस्थानात 50% आरक्षणाची व्यवस्था केली. त्यांच्या संस्थानात उच्चपदावर कार्य करणाऱ्यामध्ये एकाच जातीचे लोक होते. संस्थानामध्ये एकाच जातीचा विकास होत आहे. इतर जातीच्या विकासाकडे दुर्लक्ष् केले जात आहे. याची जाणीव शाहू महाराजांना       झाली आणि त्यातून त्यांनी इतर जातींच्या विकासासाठी 1902 पासून आरक्षणाची सुरूवात केली.

मातंग समाजाच्या तिसरी शिकलेल्या व्यक्तीला वकिल बनविले:

     शाहू महाराजांनी अस्पृश्य उध्दारासाठी अनेक कार्य केले त्यामध्ये मातंग समाजातील तिसरी शिकलेल्या तुकाराम अनाजी  गणेशाचार्य हया व्यक्तीला वकिल बनविले. यावर प्रस्तापितांनी महाराजांना विरोध केला की तिसरी शिकलेला कोणी वकिल होवू शकतो काय? महाराजांनी उत्तर दिले माझ्या संस्थानामध्ये होवू शकतो. तुम्ही तुमचे खटले त्यांना देवू नका. अशा पध्दतीने महाराजांनी खालच्या जातीतील अनेक लोकांना मोठया पदावर नियुक्त केले.

शिक्षणाचा प्रचार:

     सामाजिक विषमतेचे सगळयात महत्त्वाचे कारण म्हणजे मागास लोकांना शिक्षण नाही याची जाणीव शाहू महाराजांना झाली होती आणि त्यातून त्यांनी आपल्या संस्थानात शिक्षणाचा प्रसार केला. प्राथमिक शिक्षण संर्वांसाठी सक्तीचे मोफत केले. सर्व जातीधर्माच्या मुलांसाठी संस्थानात वसतीगृहाची स्थापना केली. मंदिरांच्या दानपेटीतील पैसा शिक्षणावर खर्च केला.

आंतरजातीय विवाहाला मान्यता:

     समाजातील जातीभेद नष्ट व्हावा म्हणून महाराजांनी आंतरजातीय विवाहाला चालना दिली. याची सुरूवात महाराजांनी स्वत:च्या घरापासून केली. त्यांनी आपली बहीण चंद्रप्रभा हीचा विवाह इंदोरचे यशवंतराव होळकर यांच्या बरोबर निश्चित केला. त्यांनतर त्यांनी सुमारे 25 आंतरजातीय विवाह लावून दिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मदत केली:

     बडोदयाचे सयाजीराव गायकवाड महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांनी डॉ. आंबेडकरांना मोठया प्रमाणात उच्च शिक्षणासाठी मदत केली. त्यांच्या मदतीशिवाय डॉ. आंबेडकरांना उच्च शिक्षण घेता आले नसते. मुकनायक वृत्तपत्रासाठी शाहू महाराजांनी भरभरून मदत केली.

     अशा या थोर महापुरूषाने आपल्या संस्थानामध्ये अनेक योजना राबविल्या, इंग्रजांच्या मदतीने रेल्वे सुरू केली. सर्व स्तरातील लोकांना शिक्षण उपलब्ध करून दिले. जातीयता नष्ट केली. याचाच परिपाक म्हणून डॉ. आंबेडकरांनी शाहू महाराजांची आरक्षणाची संकल्पना संविधानाच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर राबविली.

Post a Comment

1 Comments