Matter of Farm labour प्रश्न शेतमजूरांचाMatter of Farm labour प्रश्न शेतमजूरांचा
     भारत हा गरीबांचा देश आहे. हया देशामध्ये गरीबांची संख्या प्रचंड आहे. गरीबीमुळे व्यक्ती स्वत: चा विकास करू शकत नाही. आणि सदैव नकारात्मक विचार, नैराश्य यांनी ग्रासलेला असतो. तो स्वत: ची कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवू शकत नाही. कारण क्रयशक्ती असूनही श्रमाला योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे माणसे गरीब राहतात. आणि अल्पायुषी ठरतात. गरीबीचे विश्लेषण केले तर असे दिसते की, गरीबी ही भारतीय लोकांवर थोपवलेली व्यवस्था आहे. भारताकडे मोठया प्रमाणात नैसर्गिक साधने स्त्रोत आहेत. मात्र ही संसाधने देशातील काही लोकांनी बळकावली असल्याने इतरांना त्याचा आपल्या विकासासाठी वापर करता येत नाही. परिणामी गरीबी मोठया प्रमाणात वाढत आहे. श्रीमंतांना अधिक श्रीमंत व्हायचे आहे. आणि त्यासाठी ते वाट्टेल तो मार्ग अनुसरतात. त्यातील सगळयात सोपा मार्ग म्हणजे गरीबांचे शोषण करा आणि श्रीमंत व्हा। देशाची लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे अनेक लोकांकडे उत्पन्नाची साधने नाही. पैशा अभावी ती स्वत: च्या उत्त्पन्नाची साधने निर्माण करू शकत नाही. परिणामी त्यांना इरतरांकडे कामाला रहावे लागते. त्यातही कामाच्या मोबदल्यात फार थोडे वेतन त्यांना मिळते. श्रीमंतांनी निर्माण केलेली शोषण व्यवस्था आणि सरकारांनी याकडे केलेले दुर्लक्ष. सरकार याकडे दुर्लक्ष करणारच कारण सरकारमध्ये बसलेले लोक हे श्रीमंताचे प्रतिनिधित्व करीत असल्याने ते गरींबाकडे लक्ष कसे देणार. त्यातही शेतमजूरांचा प्रश्न हा भयंकर आहे. त्यांच्या वाटयाला तर अठरा विश्व दारिद्रय पुंजलेले आहे.
     भारत हा शेतीप्रधान देश असल्याने येथील 70 टक्के जनता ही शेतीवर अवलंबून आहे. शेतीतून मिळणाऱ्या तुटपूंज्या उत्पन्नावर उदरनिर्वाह करते. त्यातही शेतमजूर हे मोठया प्रमाणात शेतीवर अवलंबून आहेत. त्यांच्यातील अज्ञानामुळे आजपर्यंत शेतमजूरांची लोकसंख्या मोठी असूनही पाहिजे तसे संघटन निर्माण होवू शकले नाही. परिणामी त्यांच्या वाटयाला नेहमीच शोषण आले आहे.  
शेतमजूरांचे वर्गीकरण:
     देशामध्ये पहिली शेतमजूर विषयक चौकशी समिती 1950- 51 मध्ये स्थापन झाली. या समितीने शेतीमध्ये काम करणाऱ्या मजूरांचे दोन भागामध्ये वर्गीकरण केले.
1. प्रासंगीक मजूर:
     प्रासंगीक शेतीमजूर हे विशिष्ट काळामध्येच शेतीवर मजूरी करण्यासाठी उपलब्ध असते. पावसाळयात निंदन - खुरपण करण्यासाठी, उन्हाळयामध्ये काडी कचरा वेचणी इतर वेळेस काही काम असले तर करायचे नाही तर मजूरी नाही. या तत्त्वावर प्रासंगीक मजूर शेतावर काम करीत असते. त्यातून त्यांना मिळणारे उत्पन्न म्हणजेच रोजगार अत्यल्प असतो. या कमाईतून मजूर जीवनामध्ये फार काही बदल करू शकत नाही.  
2. कायमस्वरूपी मजूर:
     कायमस्वरूपी मजूर हा शेतमजूराचा दुसरा प्रकार असून यामध्ये मालकासोबत तोंडी किंवा लेखी स्वरूपाचा करार करून शेतीची कामे करणे. यामध्ये शेतमजूर 24 तास मालकाचा सालगडी म्हणून काम करीत असतो. यातून मजूराला फारसे उत्पन्न मिळत नाही. अडाणी, कमी शिकलेले लोक यापध्दतीची मजूरी करतात.
     थॉमस मन्रो म्हणतो, 1842 मध्ये शेतमजूराचा असा कोणताही वर्ग भारतात अस्तित्वात नव्हता. सांखिकी आयोगाच्या मते भारतामध्ये 54.6% मजूर हे शेतीसी संबंधित कामे करतात. 2011 लोकासंख्या आयोगाच्या अहवालानुसार 263 मिलियन लोक हे शेती क्षेत्रामध्ये गुंतलेले आहेत. आणि त्यापैकी 50% शेतमजूरी करतात.
 शेतमजूरांचे प्रकार:
1. कुटूंबातील मजूर:
     शेती कमी असल्याने आणि कुटूंब मोठे असल्याने शेतातील कामासाठी बाहेरच्या मजूरांना काम देणे परवडत नसल्याने कुटूंबातील व्यक्तीच शेतातील सर्व कामे करतात.
2. भाडोत्री मजूर:
     काही शेतकऱ्यांकडे शेती खुप असल्याने ते भाडोत्री मजूर लावून शेती करतात. मात्र या मजूरांना कमी रोजंनदारीवर विशिष्ट काळापूरतेच काम मिळते. मोठे शेतकरी ज्या ज्या वेळेस मजूरांची गरज पडते त्या त्या वेळी ते मजूरांना रोजंदारीने कामाला लावतात.
3. वेठबीगार मजूर:
     वेठबीगार मजूर म्हणजे असा मजूर की जो सावकार किंवा श्रीमंत व्यक्ती यांच्याकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी त्यांचे कामे करतो. सावकार कर्जावर चक्रवाढ पध्दतीने व्याज लावतात. त्यामुळे असे मजूर वर्षानुवर्षे काम करूनही ते कर्ज फेडू शकत नाहीत. भारत सरकारने वेठबीगारी विरोधी कायदा पारीत केलेला आहे. तरीही ग्रामीण भागामध्ये मोठया प्रमाणात याचा सावकार दुरूपयोग करतात.
शेतमजूरांची संख्या वाढण्याची कारणे:
1. लोकसंख्या वाढ:
     देशामध्ये लोकसंख्येची भरमसाठ वाढ झालेली आहे. आणि त्या प्रमाणात जॉब उपलब्ध नसल्याने. शेती हा सगळयात मोठा उद्योग असल्याने पोटा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक लोक शेतीकडे वळतात आणि शेतीमध्ये उपलब्ध असलेली कामे करतात.
2. उत्पन्नाची अपुरी साधने:
     या देशाचे दुर्दैव असे की उत्पन्नाची साधने ही काहीच लोकांच्या हातामध्ये एकवटली असल्याने इतरांकडे पैसा नसल्यामुळे ते इतर धंदे करू शकत नाही. बँकेकडे लोन मागायला गेले तर बँका गरीबांना उभे करत नाही. त्यामुळे अनेक शिकलेले तरूण शेवटी शेतीकामाकडे वळतात.
3. ग्रामिण भागातील कुटीर उद्योग बंद:
     ग्रामिण भागातील बरेच लोक कुटीर उद्योग इतर छोटया उद्योगावर निर्भर होते. मात्र जागतिकीकरणाच्या काळात ग्रामिण भागातील सर्व छोटे मोठे उद्योग बंद पडले. कारण ते मोठया उद्योगांसमोर तग धरू शकले नाही. परिणामी ग्रामिण भागातील मोठा वर्ग शेतीकामाकडे वळला.
4. शिक्षणाचा अभाव:
     गरीबीमुळे अनेक जणांना शिक्षण घेता येत नाही. परिणामी शिक्षण नसल्याने किंवा कमी शिक्षणामुळे शहरामध्ये नोकऱ्या मिळत नाही. त्यामुळे बरेच जण शेतीकडे वळतात कारण शेतीकामासाठी कोणत्याही शिक्षणाची गरज पडत नाही.
5. भांडवलाचा अभाव:
     प्रत्येकाला वाटते आपण काही तरी धंदा करावा, पण त्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. भांडवल आणायचे कुठून तो मोठा प्रश्न पडतो. बँका तारणाशिवाय गरीबाना कर्ज देत नाही. त्यामुळे अनेक जण इच्छा असूनही शेतातील मजूरीकडे वळतात.
6. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव:
     देशाला स्वातंत्र्य मिळून आज 73 वर्षे झालीत परंतु लोकसंख्येच्या प्रमाणात रोजगार निर्माण होवू शकला नाही. आजपर्यंत या देशातील राज्यकर्त्यांनी लोकांना फसवून, भूलथापा देवून सत्ता काबीज केली. मात्र सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांनी लोकांच्या प्रश्नाकडे पूर्णपणे पाठ फिरविली. आणि आजही तेच सुरू आहे. सुरूवातीच्या काळामध्ये राष्ट्रीयकरण झालेल्या संस्था, उद्योगधंदे यांचे नंतरच्या काळात खाजगीकरण करण्यात आले. परिणामी लोकांच्या हाताला काम नसल्याने नाईलाजास्तव त्यांना शेतीकामाकडे वळावे लागते.
     वरील सर्व कारणांमुळे लोक मोलमजूरीसाठी शेतीकडे वळतात. परिणामी मजूरांची शेतीतील संख्या प्रचंड वाढल्यामुळे त्यांच्या श्रमाला योग्य मोबदला मिळणे बंद झाले.
उपाययोजना:
     लॉकडाउनच्या काळामध्ये अनेक लोकांचे रोजगार गेले. ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट मुले - मुली आपला उदरनिर्वाह करण्यासाठी शेतीकाम करीत आहेत. कारण कोरोणामुळे त्यांचा शहरातील रोजगार गेला आणि नशिबी आली शेतमजूरी. प्रत्येकाला त्याच्या पात्रतेनुसार काम कसे मिळेल आणि काम मिळत नाही म्हणून लादल्या गेलेली शेतीतील मजूरी त्यातून होणारे शोषण कसे थांबवता येईल याचा विचार करू:
1. सरकारने समान काम समान वेतन कायदयाची अमंलबजावणी करावी.
2. भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्त्वामधिल कलम 41 मध्ये सांगण्यात आलेले Right to work हा मुलभूत अधिकार म्हणून घोषीत करावा. आणि सरकारने प्रत्येकाला त्याच्या पात्रतेनुसार काम दयावे.
3. शेतीतून कायमस्वरूपी रोजगार निर्माण व्हावा यासाठी शेतीवर आधारीत उद्योगधंदयांची निर्मिती करावी.
4. ग्रामिण भागातील सावकारी प्रथा बंद करावी.
5. वेठबिगारीवर कायदयाने कडक नियंत्रण आणावे.
6. ग्रामिण भागातील उपलब्ध जमिनीचे पटटे शेतमजूरांना वाटून दयावे.
7. जमिनदाराकडील अधिकच्या जमिनी काढून घेवून त्या शेतमजूरांना वाटून दयाव्या.
8. सरकारने शेतमजूरांना विमा कवच दयावे.
9. शेतकऱ्याप्रमाणे मजूरांनाही मासिक भत्ता दयावा.
10. शेतीवर आधारीत उद्योगधंदयांची निर्मिती करण्यासाठी बेरोजगार तरूणांना भांडवल पुरवावे. 

Post a Comment

1 Comments