डॉ. आंबेडकरांचा विद्या व्यासंग भाग - 2

डॉ. आंबेडकरांचा विद्या व्यासंग भाग - 2

     राजगृहावर 7 जुलै 2020 ला हल्ला होवून जवळपास 15 दिवस झाले. मात्र अजूनपर्यंत हल्लेखोराला पोलिसांनी पकडले नाही. आणि त्याबाबत अद्ययावत माहिती पोलिस देत नाही. ही बाब चिंताजनक आणि निषेधात्मक आहे. बाबासाहेबावर प्रेम करणाऱ्या लाखो अनुयायांचे लक्ष या प्रकरणाकडे लागून आहे. राजगृह हे बाबासाहेबांचे जीव की प्राण होते. पुस्तकांसाठी घर बांधणारा ध्येयवेडा माणूस म्हणून बाबासाहेबांसारखे उदाहरण जगातही सापडणार नाही. अनेक हालअपेष्टा सहन करून बाबासाहेबांनी विकत घेतलेल्या पुस्तकांची हेळसांड होवू नये म्हणून पुस्तकांसाठी घर बांधले आणि त्याला राजगृह असे नाव दिले. यावरून बाबासाहेबांचे पुस्तकावर असलेले जिवापाड प्रेम दिसून येते. भारतातील लोकांच्या गुलामीचे मुळ हे अज्ञान आहे. शिक्षण मिळाले नाही तर व्यक्ती दुसऱ्याचा गुलाम बनतो. स्वत:चे वर्चस्व निर्माण करण्यासाठी प्रस्तापितांनी बहूजनांना शिक्षणाचा अधिकार नाकारला होता. अज्ञानातून बहुजनांना बाहेर काढण्यासाठी बाबासाहेबांनी शिक्षणावर जास्त भर दिला.

बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीत एवढे ज्ञान प्राप्त केले की, प्रस्तापितांनाही त्यांच्या समोर घाम फुटत असे. बाबासाहेब म्हणत, तुम्ही शिक्षण घ्या वाघासारखे बना म्हणजे तुम्हाला घाबरण्याची गरज पडणार नाही.
   पुस्तके माणसाचे मस्तक बनवतात आणि मस्तक कुणापुढेही गुलाम बनत नाही. मस्तक बळकट बनवण्यासाठी पुस्तके वाचायला हवी. त्यासाठी बाबासाहेबांचा विद्या व्यासंग समजून घेवून त्यावर बहुजनांनी कृती करावी.

 1. वाचन पध्दती:

  डॉ. आंबेडकरांचे वाचन अफाट होते. त्यांचे एकाच वेळी अनेक विषयाचे वाचन सुरू असे. वाचनाबाबत त्यांना कधीच कंटाळा येत नव्हता. कारण एकप्रकारची वाचनाची भूकच त्यांना लागलेली असे आणि पुस्तकाच्या रूपाने ते ज्ञानाची भूख भागवत होते. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत अनुकरणीय अशी त्यांची वाचनपध्दती होती. ते कोठेही वाचू शकत होते. त्यांना वाचनासाठी शांत वातावरण लागत असे, असे नाही. आश्चर्य म्हणजे ते गर्दीतही वाचू शकत. दिवसातील कोणत्याही वेळी त्यांचे वाचन सतत चालू असे. कोणतेही पुस्तक वाचायला घेतले की ते साररूपाने वाचायचे असे नाही, तर पुस्तकाच्या वेष्टणातील माहितीही ते वाचून काढीत. त्या माहितीवरून त्याच लेखकाच्या इतर पुस्तकांची माहिती मिळवून तीही पुस्तके ते वाचून काढीत असत. एखाद्या पुस्तकात ज्या इतर पुस्तकांचे संदर्भ दिलेले असेल ती सर्व संदर्भ ग्रंथ विकत घेवून ती वाचून काढीत असत. त्यामुळे त्यांचे वाचन एकप्रकारचे साखळी पध्दतीने चालत असे. त्यामुळे त्यांचा त्या विषयाचा सखोल अभ्यास झालेला असायचा.

2. पुस्तकांसाठी नेहमी अधिर:

    बाबासाहेब पुस्तकांसाठी नेहमी अधिर असायचे. जे पुस्तक पाहिजे असेल ते ताबडतोब मिळावे म्हणून ते तत्पर असत. पुस्तकांसाठी ते ऐवढे अधिर होवून जात की, ते मिळाले नाही तर त्यांना चैन पडत नसे. एकवेळी त्यांना जेवण नसले तरी चालायचे पण पुस्तक त्यांना मिळालेच पाहिजे हा त्यांचा कटाक्ष असे. कुठल्याही विषयाची चांगली तयारी करण्यासाठी आणि स्वत: चे मत बनवण्यासाठी त्या विषयावरील उलट सुलट मते असणारी सर्व पुस्तके बाबासाहेब वाचून काढीत असत.

3. वाचतांना पेन्सिलचा वापर:

     बाबासाहेब पुस्तक वाचतांना नेहमी पेन्सिलचा वापर करीत असत. त्यांच्या टेबलावर महागडी पेन आणि टोकदार पेन्सिल असायची. वाचत असतांना पुस्तकाच्या पानावर ते वेळोवेळी खुणा करीत असत. विशिष्ट खोलीत बसून पुस्तके वाचने त्यांना जमत नसे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक खोलीत पुस्तके पडलेली असत. आश्चर्य म्हणजे कधीकधी दोन - दोन, तीन - तीन ग्रंथांचे एकाच वेळी वाचन सुरू असे. मुंबईच्या राजगृहामध्ये सुमारे बाविस हजार पुस्तके दिल्ली येथील घरी सुमारे पंधरा हजार निवडक ग्रंथसंपदा होती. बाबासाहेबांना आपल्या ग्रंथाचा अभिमान वाटत असे. भारतातील कोणत्याही व्यक्तीकडे ऐवढा मोठा ग्रंथसंग्रह असेल असे बाबासाहेबांना वाटत नव्हते.

4. पंडीत मदनमोहन मालवीय यांची पुस्तकाची मागणी:

     पंडीत मदनमोहन मालवीयांनी डॉ. आंबेडकरांचे वैयक्तिक ग्रंथालय बघितल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटले. आणि त्यांनी ते ग्रंथालय बनारस हिंदू विश्वविद्यालयासाठी विकत मागितले. तेंव्हा त्यांच्या मागणीला नकार देत बाबासाहेब म्हणाले,तुम्ही तर माझी शक्तीच विकत मागता, ती मी कशी देईन.” बाबासाहेबांचा आपल्या पुस्तकावर फार जीव होता. त्यांनी ती सर्व पुस्तके देश विदेशातून विकत आणली होती आणि त्यासाठी त्यांना अनेक वेळा उपासी रहावे लागले होते. भुकेची पर्वा करता त्यांनी अनेक वेळा पुस्तकावर खर्च केलेला होता. त्यामुळे ते आपल्या ग्रंथालयातील पुस्तके कोणालाही देत नसत.

5. पुस्तकांना हात लावल्यास गोळी घालीन:

    बाबासाहेबांनी घर बांधण्यासाठी बँकेकडून 40 हजार रूपयाचे कर्ज काढले होते. ते कर्ज फेडण्यासाठी त्यांना अनेक हप्ते भरावे लागले. तरीही त्यांनी आपल्या ग्रंथालयाच्या विक्रिला नकार दिला होता. कर्जबाजारीपणामुळे माझ्या घरावर जप्ती आली आणिबेलिफाने माझ्या पुस्तकांना हात लावला तर त्याला गोळी घालून ठार मारेन ” असे बाबासाहेब म्हणत. त्याचप्रमाणे त्यांच्यासारखा ग्रंथप्रेमी असलेल्या माणसाला सारी ग्रंथसंपदा अर्पण करीन असेही म्हणत. यावरून बाबासाहेबांचे ग्रंथप्रेम आणि ग्रंथाच वेड किती प्रचंड होत हे दिसून येते.

6. कोणते पुस्तक कुठे, याची त्यांना माहिती असे:

   आपल्या ग्रंथालयातील सर्व पुस्तके ग्रंथालयातील कुठल्या शेल्फवर आहेत हे बाबासाहेबांच्या बरोबर लक्षात असे. एखादयावेळी पुस्तक पाहिजे जवळ कोणी जाणकार मनुष्य नसेल तर ते अशिक्षित गोरख्याला अमुक फळीवरील अमुक ठिकाणचे पुस्तक घेवून ये असे सांगत. गोरखा अक्षर ओळख नसतांना बाबासाहेबांना हवे ते पुस्तक आणून देत असे. ठेवलेल्या पुस्तकाची जागा बाबासाहेबांना पक्की लक्षात असे.

7. पुस्तकांच्या पाच-पाच प्रती विकत घेत:

    बाबासाहेब पुस्तकाच्या पाच-पाच प्रती विकत घेत असत. कारण पुस्तक वेळेवर हाती पडावे, पुस्तक लवकर सापडावे. आणि जर पुस्तक हरपले तर पुन्हा बाजारातून ते मिळेल का नाही याची त्यांना चिंता असे म्हणून ते पाच पाच प्रती विकत घेत. त्यांच्या वाचनात चरित्र वाङमय भरपूर असायचे. नेपोलियनची अनेक चरित्रे त्यांच्याकडे होती. बायबलच्या तर इतक्या प्रती त्यांच्याकडे होत्या की, कदाचित एखादया पाद्रयाकडेही त्या नसतील.

8. पुस्तकांच्या दुकानात तासन तास घालवत:

   बाबासाहेब एखादया वेळेस पुस्तके खरेदी करण्यासाठी पुस्तकांच्या दुकानात गेले की, तीन चार तास बाहेरच येत नसत. दुकानातील सगळी पुस्तके ते चाळून काढीत असत. वेगवेगळया संदर्भासाठी आवश्यक असणारी पुस्तके जोपर्यंत मिळत नसत तोपर्यंत त्यांचे शोधकार्य सुरू असे. प्रत्येक पुस्तक त्यांना हवेहवेसे वाटे. डिक्शनऱ्यांची तर त्यांच्याकडे रासच असे. एकदा दुकानात गेल्यानंतर हजारो रूपयाचे पुस्तके विकत आणत. अनेक वेळा जास्त पैसे नसल्यामुळे पुस्तके उधार आणीत. दुकानदार सुध्दा त्यांच्यावर विश्वास ठेवून जे पाहिजे ते पुस्तके त्यांना उधार देत असत.

9. रात्री 2 वाजेपर्यंत वाचन:

    त्यांचे वाचन साधारणपणे रात्रीचे 2 वाजेपर्यंत चालत असे. झोपेतून मधेच जाग आली तरी ते उठून वाचन सुरू करीत. कधीकधी तर वाचनात ऐवढे मग्न होत की, पुस्तक बंद करून ठेवून बाहेर बघितले तर बराच दिवस वर आलेला असे. त्यांना वाचनात वेळ कशी गेली याचे भान राहत नसे. वाचनापायी शरीरातील सर्व सवयीवर एकप्रकारचे नियंत्रणच त्यांनी मिळविले होते.

    पुस्तके वाचतांना ती काळजीपूर्वक, व्यवस्थित आणि चांगल्या रीतीने वापरण्याची त्यांची पध्दती होती. ते पुस्तक जरा सुध्दा खराब होवू देत नसत. वाचलेली पुस्तके पुन्हा पुन्हा वाचून काढणे हा त्यांचा छंद होता. बाबासाहेब सार्वजनिक कार्यामध्ये इतके गुंतलेले असायचे की त्यांना वाचण्यासाठी वेळ अपूरा पडायचा परंतु त्यांनी वेळेबाबत कधीही तक्रार केली नाही. आपल्या सामाजिक कार्याच्या प्रचंड व्यापातून ते वाचनासाठी वेळ कसा काढत हे आजच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासण्यासारखे आहे. त्यांच्या वाचनाच्या छंदातील एक शतांश सदगुण जरी विद्यार्थ्यांनी घेतला तर त्यांच्या जीवनामध्ये अमुलाग्र परिवर्तन घडून येवू शकते. असे बाबासाहेबांचे वाचन व्यसन होते.

संदर्भ: डॉ.बा.आ. शैक्षणिक चिंतन- डॉ.संजय एन. बरडे

Post a Comment

0 Comments