गावचा सरपंच कसा असावा?


गावचा सरपंच कसा असावा?

     भारत हा खेडयांचा देश आहे. आज भारतामध्ये 5,93,732 गावे आहेत. आणि महाराष्ट्रात 63,663 गावे आहेत. स्वातंत्र्य मिळून 73 वर्षे झाली मात्र गावे ही जसीच्या तसीच आहेत. उदास, भकास, सोयीसुविधांचा अभाव असलेली. गावातून अनेक लोकांचे शहराकडे स्थलांतर झाले आहे. ते लोक शिकले, सवरले, नोकऱ्या, उद्योगधंदयामध्ये कामाला लागले. त्यांचा विकास झाला सोबतच शहरांचाही विकास झाला. मात्र खेडयांचा विकास व्हायला तयार नाही. खेडयातून शहरात जाणारे आणि तेथे स्थायिक होणाऱ्या लोकांना आपल्या जन्मभूमिची नेहमी आठवण होते. आपल्या गावाचाही विकास झाला पाहिजे. रस्ते, विज, पाणी, आरोग्य यासारख्या मुलभूत सुविधा निर्माण झाल्या पाहिजे. असे अनेकांना वाटते. परंतु अनेक काळापासून गावावर राज्य करणाऱ्या लोकांनी गावासाठी काहीही केले नाही.

अनेक सरपंच आले आणि गेले त्यांनी फार काही दिवे लावले नाही. गावातील राजकारण ऐवढ भयंकर असते की सरपंच होण्यासाठी कोणत्याही स्तराला जाण्याची लोकांची तयारी असते. मात्र एकदा सरपंच झाले की बस. पुढील पाच वर्षे फक्त गावावर राज्य करायच आणि सरपंच म्हणून शेखी मिरवायची (काही अपवाद) सरपंच हा गावचा प्रथम नागरिक असतो.
    जे अधिकार देशामध्ये प्रधानमंत्र्याला असतात त्यासारखे अधिकार सरपंचाला गावामध्ये असतात. पण सरपंचाला स्वत: अधिकार माहित नसतात. काहींना माहिती असले तरी ते उपयोगात आणत नाहीत. आणि ग्रामसेवक, तलाठी यांच्या पाठीमागे फिरत बसतात. चिरमिरीसाठी प्रशासकीय लोकांच्या पाठीमागे फिरत बसून गावचा सत्त्यानाश करून घेतात. म्हणून गावे ही साचलेल्या डबक्याप्रमाणे सुस्त, जशीच्या तशी पडून आहेत.

     गावांचा विकास करण्यासाठी सरकारच्या अनेक योजना आहेत. सरकारने यासाठी ग्रामविकास खाते निर्माण केलेले आहे. सरकार ग्रामविकासासाठी दरवर्षी कोटयावधी रूपये खर्च करते मात्र ऐवढे असूनही गावाचा विकास का होत नाही? गावाला कार्यक्षम नेतृत्त्व का मिळत नाही? ग्रामसेवक, तलाठयासारखे प्रशासनातील लोक योग्य काम का करीत नाहीत? यासारखे अनेक प्रश्न निर्माण होतात. परंतु गावामध्ये अशा अनेक कटकटी, अडचणी असतानाही काही गावांच्या सरपंचानी त्यावर मात करून आपल्या गावामध्ये अनेक सोयीसुविधा निर्माण करून आदर्श गाव निर्माण केले आहे. त्यांचे अनुकरण करता येईल का? यासाठी मागास गावातील सरपंचांनी प्रयत्न करायला हवे. खालील काही उदाहरणावरून गाव सुधारण्याची कल्पना येवू शकेल.

पोपटराव बागूजी पवार:

    पोपटराव पवार हे अहमदनगर जिल्यातील हिवरे बाजार ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत. हिवरे बाजार गाव छोट, गावामध्ये कोणत्याही सोयी सुविधा नव्हत्या. त्यातच 1972 मध्ये महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला. त्याचा फटका इतर गावाप्रमाणे हिवरा बाजार या गावालाही बसला. हिवरा बाजार हे गाव शेतीवर अवलंबून होते. दुष्काळात शेती पूर्णपणे उध्वस्त झाली होती. लोकांकडे कोणतेही उत्पन्नाचे साधन शिल्लक नव्हते. बेरोजगारी मोठया प्रमाणात वाढली आणि त्यातून अनेक लोकांना दारूचे व्यसन जडले. 15 वर्षे हे सर्व हिवरे बाजार हे गाव सहन करीत होते मात्र यातून कोणीही मार्ग काढायला तयार नव्हते. 1989 साली पोपटराव पवार हे गावचे सरपंच झाले. त्यांचे शिक्षण पदव्युत्तर पदवी पर्यंत झालेले होते. त्यांच्या डोक्यात सतत गाव सुधारण्याच स्वप्न होते. आणि त्या स्वप्नाने ते      झपाटून गेले होते. त्यांनी सरपंच झाल्यावर सात सुत्री अजेंडा तयार केला. आणि त्याची अंमलबजावणी केली ती पुढीलप्रमाणे:

1. झाडे तोडण्यावर बंदी

2. कुटूंबकल्याण योजनेवर भर

3. दारूबंदी

4. श्रमदान

5. लोटाबंदी

6. प्रत्येक घरी स्वच्छालयाची निर्मिती

7. भूजल संधारणाची कामे

    वरील सात सुत्री कामे पोपटराव त्यांच्या सहकार्यांनी हाती घेतली आणि निष्ठापूर्वक ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. गावातील पाण्याचा प्रश्न बिकट होता. त्यांनी गावाच्या आसपास अनेक जलसंधारणाची कामे केली. त्यामुळे आसपासच्या विहिरींची भूजल पातळी वाढली. त्याचा फायदा शेतीलाही झाला. आज 315 घरांच्या गावाच मॉडेल हे महाराष्ट्रातील जवळपास 1000 गावामध्ये सरकार राबविण्याचा प्रयत्न करीत आहे. पोपटराव पवार सांगतात की त्यांच्या गावच सरासरी उत्त्पन्न हे 30,000 ते 35,000 ऐवढे आहे. 1995 मध्ये ते केवळ 830 रू होते. जे लोक कामधंदयासाठी गाव सोडून गेले होते त्यातील 70 कुटूंब हे वर्ष 2000 मध्ये गावात परत आले. गावातील 50 ते 60 लोकांचे वार्षिक उत्त्पन 10 ते 12 लाख रूपये आहे. गावामध्ये दारीद्रयरेषेखाली एकही व्यक्ती नाही. प्राथमिक शिक्षणावर ग्रामपंचायतीने मोठा भर दिला आहे. गावातील 100 टक्के लोक साक्षर झाले आहेत. भूजल पातळी वाढल्यामुळे गाव पाणीदार झाले असून त्यातून डेरी उद्योगाला चालना मिळाली आहे. लोकांचे उत्त्पन वाढले. गावात रोजगार निर्मिती झाली त्यामुळे लोकांचे स्थलांतर थांबले. या सर्व विकासामुळे गावाला आदर्श गावासारखे अनेक पुरस्कार मिळाले.

भास्करराव पेरे:

   भास्करराव पेरे हे औरंगाबाद जिल्हयातील पाटोदा गावचे सरपंच आहेत. माणूस साधा सरळ, वारकरी संप्रदायात वाढलेला. औरंगाबाद जवळ असल्याने पाटोदयाचे लोक कामकाजासाठी नेहमी औरंगाबादला असतात. त्यापैकी भास्कर पेरे एका हॉटेल मध्ये वेटर म्हणून कामाला होते. मात्र काही तरी करून दाखवण्याची जिद्द भास्कररावला शांत बसू देत नव्हती. आपला वेटरचा जॉब सोडून देवून ते गावात आले आणि गावाच्या सुधारणेसाठी काम करू लागले. गाव तसे छोटे, गाव औरंगाबाद एम.आय.डी.सी पासून जवळ. तरीही गावाचा विकास नव्हता. गावात विज, चांगली रस्ते, पिण्यायोग्य पाण्याचा अभाव, चांगल्या शिक्षणाचा अभाव होता हे भास्कररावांना पहावेना. गावचा सरपंच झाल्यानंतर त्यांनी सर्व अडचणीवर मात करीत एक आदर्श गाव निर्माण केले

   स्वच्छता अभियानात पहिला राज्यस्तरीय पुरस्कार पटकावणारे गाव म्हणजे पाटोदा होय. मागील आठ वर्षापासून गावामध्ये भास्करराव पेरेंनी अनेक उपक्रम राबविले. त्यापैकी काही पुढे दिलेले आहे.

 1. शुदध पाणीपुरवठा 24 तास

2. शाळा, अंगणवाडीमध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे

3. गावाच्या मुख्य रस्त्यावर सी.सी.टी.व्ही. कॅमेरे

4. प्रत्येक घरासमोर ओल्या आणि सुक्या कचऱ्यासाठी कचराकुंडी

5. प्रत्येक गल्लीत हात धुण्यासाठी बेसीन व्यवस्था

6. शेगडी वापरण्यास बंदी

7. 24 तास विज, पाणी

8. स्वच्छता गृहांचा 100 टक्के वापर

9. महिलांना दळणाची मोफत व्यवस्था

10. महिलांसाठी सॅनिटरी पॅडची मोफत व्यवस्था

   यासारख्या अनेक सोयी सुविधा केल्यामुळे सरपंच भास्करराव पेरे यांचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर अभिमानाने घेतले जाते. आज त्यांच्यामुळे पाटोदा गावचा चेहरामोहरा बदलला आहे.

   वरील उदाहरणांचा मागासलेल्या गावातील सरपंचानी आदर्श घ्यावा खालील गोष्टींची गावामध्ये अंमलबजावणी करावी. यातून गावचा विकास करण्यास मदत होईल.

 1. गावातील लोकांच्या समस्या ऐकून तत्काळ उपाययोजना करावी.

 2. प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या पुढेपुढे करता गावातील समस्या सोडवण्यासाठी त्यांच्यावर वचक ठेवणे.

 3. भ्रष्टाचारमुक्त ग्रामपंचायत निर्माण करावी.

4. रस्ते, विज, पाणी यांचा प्रश्न मार्गी लावावा.

5. गावच्या स्वच्छतेवर भर दयावा.

6. गावातील शाळेचा विकास करावा

7. सरकारी दवाखाने, पशुचे दवाखाने यामधील सोयीसुविधांकडे लक्ष दयावे.

8. बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी उपाययोजना करावी

9. ग्रामपंचायती मार्फत महिलांना लघुउद्योग उभारणीत मार्गदर्शन आर्थिक मदत उपलब्ध करून देणे.

10. व्यसनमुक्त गावाची संकल्पना राबविणे.

11. स्वच्छ भारत योजनेची अंमलबजावणी करणे, सांडपाणी, गटारे यांचे योग्य नियोजन करणे.

12. महिलांचे संरक्षण गावातील गैरप्रकारावर कायदयाच्या माध्यमातून बंधने आनणे.

13. तरूणांना व्यवसाय मार्गदर्शन करावे.

14. गावामध्ये ग्रंथालयाची निर्मिती करावी.

15. पांधणमुक्त गाव

17. स्मशानभूमी शुशोभिकरण आणि स्वच्छता

18. जलसंधारणाची कामे राबवावी.

19. गावातील गल्ल्या रस्त्यांचे कामे करावी.

20. महिलांसाठी सॅनिटरी पॅड व्हेंडीग मशिन इंस्टॉलेशन

21. ग्रामपंचायतीने स्वत: च्या उत्पन्नाची साधने वाढवावी.

   सरपंच हा गावचा प्रमुख असल्याने तो गावातील सर्वांसाठी आदर्श आहे. आणि त्याने तो आदर्श आपल्या कृतीतून दाखवून दयावा. वरील उदाहरणावरून कळते की, पोपटराव पवार उच्च शिक्षित होते मात्र भास्करराव पवार जास्त शिकलेले नाहीत. तरीही दोघांनी आपले गाव आदर्श करून दाखविले. गावच्या विकासासाठी सरपंच किती शिकलेला आहे याला महत्त्व नाही. परंतु तो किती कार्यक्षम आहे. गावातील लोकांच्या समस्याची त्याला किती जाणीव आहे. आणि त्या समस्या सोडवण्यासाठी तो किती सक्षम आहे. हे पाहणे महत्त्वाचे आहे. जो व्यक्ती गावच्या समस्या सोडू शकत नाही अशा अकार्यक्षम व्यक्तींला सरपंच पदावर राहण्याचा मुळीच अधिकार नाही. भविष्यात अशा व्यक्तींना निवडून देतांना लोकांनी विचार करावा.

Post a Comment

2 Comments

  1. पोपटराव पवार व भास्कराव पेरे आदर्श सरंपच आहेत. यांचे प्रत्येक सरंपच ने अनुकन व आदर्श निर्माण केला पाहिजे

    ReplyDelete