अण्णा भाऊ साठे आणि मातंग समाज

अण्णा भाऊ  साठे आणि मातंग समाज

  चातुर्रवर्णव्यवस्थेमुळे गावकुसाबाहेर असलेला माणूस, अठराविश्व दारिद्रय वेशीला पुंजलेले पण शिक्षणाची प्रचंड आवड. गरीबी आणि जातीयता यामुळे शिकता येत नाही.

असे असतांना दिड दिवस शाळेत गेल्यावर  तीथे  सवर्णांची जातीयता आणि भेदभाव सहन झाल्याने शाळा सोडून देणारे आणि जीवनामध्ये जे भोगल आहे ते आपल्या लेखणीतून उतरवणारे थोर लेखक, साहित्यीक म्हणजे साहित्यसम्राट अण्णा भाऊ  साठे होत. कोणाच्या पोटी कोण जन्माला येईल सांगता येत नाही. त्याच बरोबर कोणी कोणाच्या पोटी जन्म घेईल हेही कोणाच्या हातात नाही.
 मात्र खालच्या जातीत जन्म झाल्याने जातीयतेच लेबल लागल आणि आयुष्यभर ज्यांनी अण्णाभाऊनां झिडकारल, दूर लोटल तेच लोक आण्णांना भारतरत्न मिळाव म्हणून टाहो फोडतात त्यांची कीव येते आणि वाईट वाटते. अण्णाभाऊ  साठेंच योगदान आपल्याला विसरता येणार नाही. मात्र अण्णाच्या पश्चात त्यांच्या समाजबांधवांचा राजकारणापूरता वापर करणारे अनेक महाभाग या देशात आहेत. अण्णाभाऊ  साठेंचा मातंग समाज आज हालाखीच जीवन जगत आहे. त्यांनी अण्णाच योगदान लक्षात घेवून त्यांच्या समाजबांधवांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी थोडा जरी प्रयत्न केला तरी अण्णाभाऊनां खरी श्रध्दांजली ठरेल.

 अण्णा भाऊ  साठेंचा पूर्वइतिहास:

   अण्णा भाऊ  साठे यांचे पूर्णनाव तुकाराम भाउराव साठे असे होते. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्हयातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी मातंग समाजामध्ये झाला. त्यांनी दोन लग्न केली होती त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव कोंडाबाई साठे तर दुसरीचे नाव जयवतां साठे होते. त्यांना एकुण तीन अपत्य झाली. त्यापैकी एक मुलगा नाव मधुकर आणि दोन मुली शांता आणि शकुंतला. त्यांचे लेखन समाजप्रबोधन आणि राजकीय सुधारणेवर आधारीत होते. खानकामगार, गिरणीकामगार म्हणून काम करणारे अण्णाभाऊ  सुरवातीला मार्क्सवादी कामगार चळवळीने भारावून गेले होते. मात्र या चळवळीतील हिंसा आणि रक्तपात त्यांना मान्य नव्हता म्हणून ते शेवटी आंबेडकरवादाकडे वळले. अण्णांनी आपल संपूर्ण आयुष्य हे चिरागनगर झोपडपट्‌टीमध्ये काढले. याच झोपडपट्‌टीमध्ये अण्णांच्या साहित्याची निर्मिती झाली.

   अण्णा भाऊ  साठे हे संपूर्ण देशाला एक शाहीर म्हणून परिचित आहे. त्यांनी लिहिलेल्या अनेक कादंबऱ्या, नाटके, कथा, कविता, पोवाडे, प्रवासवर्णने लावण्या ही एका सशक्त साहित्यीकाची भारतीय साहित्याला समृध्द करणारी देणगी आहे. अण्णाभाउंची लावणी "माझी मैंना गावकड राहिली, माझ्या जीवाची होतीया काहीली" लोकसंगितातील लावणी अजरामर झालेली आहे.

अण्णा भाऊचे साहित्य लिखान:

  अण्णा भाऊनी मराठी साहित्यामध्ये पर्वताऐवढे कार्य केले. त्यांच्या नावावर तब्बल 35 कादंबऱ्या आहेत.  त्यापैकी फकिरा ही कादंबरी विशेष गाजली आणि तीला 1961 मध्ये महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला.  ही कादंबरी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखनीला अर्पण केली आहे. त्यांच्या अनेक लघुकथा भारतीय अभारतीय भाषामध्ये प्रसिध्द झाल्या आहेत. त्यांनी अनेक लावण्या लिहिल्या सादरही केल्या त्यापैकी 'मुंबईची लावणी'  'मुंबईचा गिरणीकामगार' या दोन गाण्यातून मुंबईतील दुर्व्यवहार, शोषणकारी, भेदभावपूर्ण व्यवस्था स्पष्ट केली आहे. लावण्या, कादंबरी, लघुकथाबरोबरच अण्णांनी अनेक नाटके, रशियातील भ्रमंती, पोवाडा शैलीतील 10 गाणी 12 पटकथा लिहिल्या.

अण्णा भाऊचा राजकीय प्रवास:

 खानकामगार, गिरणीकामगार, घरगडी असे अनेक काम करतांना अण्णाभाऊ  कामगार चळवळीसी जोडले गेले. सुरूवातीला त्यांचा संबंध कम्युनिष्ट पार्टीचे कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या सोबत आला. शाहिर अमर शेख आणि दत्ता गवाणकर यांच्या सोबत 1944 मध्ये लालबावटा कलापथक स्थापन केले. त्याचेच रूपांतर नंतर लालबावटा संघटनेमध्ये झाले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंग्रजांकडून सत्तेचे हस्तांतर हे उच्च वर्णींयाच्यां हातात गेले हे त्यांना मान्य नव्हते म्हणून 16 ऑगस्ट 1947 मध्ये  त्यांनी मुंबई येथे 20,000 लोकांना बरोबर घेवून मोर्चा काढला त्या मोर्च्यातील घोषणा होती "ये आझादी झुठी है देश की जनता भूखी है." याद्वारे इथल्या सत्तेत असलेल्या उच्चवर्णीयांना अण्णाभाउंनी एकप्रकारे आव्हानच दिले. त्यानंतर त्यांनी अनेक वर्षे कम्युनिष्ट पार्टीमध्ये काम केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णांचे मोठे योगदान होते.

  मात्र नंतरच्या काळामध्ये त्यांच्या विचारसरणीमध्ये प्रचंड बदल झाला आणि ते डॉ. आंबेडकरांच्या विचारसरणीकडे वळले. त्यांनी दलित चळवळीमध्ये काम करणे सुरू केले. दलितांची अस्मिता आपल्या साहित्यातून परखडपणे मांडली. 1958 मधील पहिल्या दलित साहित्य संम्मेलनातील उद्घाटनपर भाषणामध्ये त्यांनी मांडलेले विचार आजही अनेकांना प्रेरणा देतात. त्यामध्ये ते म्हणाले होते की, "पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलित कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे." त्यामुळे दलित आणि कामगारांना राजकीय, सामाजिक सत्तेमध्ये वाटा मिळावा. त्या शिवाय देशाचा विकास होणार नाही. अशाप्रकारे दलित कामगारांचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले होते.

अण्णाभाऊ  शेवटी आंबेडकरी चळवळीकडे वळले, मातंग समाजाचे काय?

   अण्णांच अर्ध आयुष्य हे कम्युनिष्ट चळवळीमध्ये गेले. मात्र त्यांना कळले की कम्युनिष्ट हे जरी शोषणव्यवस्थेच्या विरूध्द असले तरी त्यांचे प्रमुख हे उच्चर्णीयच आहेत. हिंसेच्या जोरावर सत्ता प्रस्तापित करता येणार नाही. आणि ती जरी केली तरी ती फार काळ टिकणार नाही. म्हणून डॉ.आंबेडकरांचा लोकशाही विचार आणि बुध्दांची अहिंसा या जगाला तारू शकते असे त्यांना वाटले त्यामुळेच त्यांनी आंबेडकरवाद स्विकारला.

   मात्र आज मातंग समाजाने अण्णांभाउंच्या विचाराशी फारकत घेतलेली दिसते. "जग बदल घालूनी घाव सांगून गेले मला भिमराव" असे म्हणणारे अण्णाभाऊ आणि वेगळी भूमिका मांडणारा मातंग समाज आजही हिंदू समाजाची अडगळ म्हणून जीवन जगत आहे. हिंदू धर्मामध्ये मातंग, चांभार आणि महार जातींना अतिशुद्राचा दर्जा होता. त्यांना पशूपेक्षाही हिन दर्जाची वागणूक दिल्या जात होती, मंदिर प्रवेश नव्हता, पानवठयावर पाणी भरू दिल्या जात नव्हते. डॉ. आंबेडकरांनी एका दणक्यात अस्पृश्यता उध्वस्त करून टाकली. आणि जो धर्म माणसाला माणूस मानत नाही त्या धर्माला सोडचिठठी देवून स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्वावर आधारलेला बौध्द धर्म स्विकारला. त्यामुळे सर्व महार जात बाबासाहेबांच्या मागे गेली मात्र मातंग हे आपल्या जातीला चिकटून राहिले. बौध्दांकडे बाबासाहेबांचा आदर्श होता. बाबासाहेबांनी सांगितलेला "शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा" हा संदेश लक्षात ठेवून बौध्द लोक शिकले एस.सी तील आरक्षणाचा फायदा घेतला नोकरी, धंदयाला लागले. मात्र अण्णांभाउंनी सांगूनही मातंग समाजाने बाबासाहेबांचे विचार स्विकारले नाही. ज्यावेळी बौध्द समाज शिक्षण घेत होता, त्यावेळी मातंग समाज शिक्षण घेता पारंपारीक काम करणे, हिंदूधर्मातील उत्सव साजरे करणे, देवाला नवस करणे, यामध्ये गुंतला होता आणि आजही तेच करीत आहे. (याला काही अपवाद आहेत) नुकतच माझ्या गावामध्ये घडलेल उदाहरण मातंग समाजातील मुलाला डोक्याचा आजार होता. आणि आईवडील मात्र तो आजार बरा होण्यासाठी नवस करत होते. त्या आजाराला कंटाळून त्या मुलाने विहिरीत जीव देवून आत्महत्त्या केली. तीन चार दिवस कोणालाच काही माहित नव्हते. आईवडील जवळचे नातेवाईक सगुण, अंगारे धुपारे याचा वापर करीत होते. यावरून मातंग समाज हा अंधश्रध्देच्या किती आहारी गेलेला आहे हे कळते. आज मातंग समाजाची अवस्था वाईट आहे त्याचे कारण म्हणजे शिक्षण. आज ग्रॅज्युएशन पूर्ण केल्याशिवाय आरक्षणाद्वारे नोकऱ्या मिळत नाही. त्यामुळे मातंग समाजातील तरूणांनी चांगल शिक्षण घ्याव. तरच त्यांना आरक्षणाचा फायदा होवू शकेल. केवळ एस.सी च्या आरक्षणातून विभाजन करून मातंग समाजासाठी वेगळया आरक्षणाची मागणी ज्या लोकांकडे केली जाते मुळात ते आरक्षणाचे विरोधक आहेत आणि त्यांना आरक्षण संपवायचे आहे. त्यामुळे मातंग समाजाला आपले मित्र आणि आपले शत्रू कोण हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत सर्व व्यर्थ आहे.

Post a Comment

0 Comments