Dr. Ambedkars reading passion & RajgruhaDr. Ambedkars reading passion & Rajgruha

डॉ. आंबेडकरांचा वाचन व्यासंग अणि राजगृह

     डॉ. आंबेडकर जगातील असे महापुरूष की ज्यांनी आपल्या ग्रंथप्रेमापोटी घर बांधले आणि जीवनातील जवळजवळ सर्वच वेळ पुस्तकांच्या सानिध्यात घातला. जगामध्ये असे एखादेच उदाहरण सापडेल की, ज्याने पुस्तकावर आपल्या मुले आणि बायकोपेक्षाही जास्त प्रेम केल. बाबासाहेबांनी पुस्तके ही जीवनाचे अंग मानले होते. पुस्तकांशिवाय जीवन अधुरे आहे असे त्यांना वाटे. त्यांनी राजगृहामध्ये 50,000 ग्रंथांचा संग्रह केला होता. बाबासाहेब हे जगातील एकमेव उदाहरण होते की ज्यांच्याकडे हजारो पुस्तकांचे वैयक्तिक ग्रंथालय होते. शिक्षणासाठी ग्रंथ आवश्यक आहे आणि शैक्षणिक संस्थांसाठी ग्रंथसंग्रह नितांत आवश्यक आहे असे ते म्हणत. पुस्तकांशिवाय शाळा, महाविद्यालये विद्यार्थ्यांना परिपूर्ण ज्ञान देउ शकणार नाही. अशा संस्थामधील विद्यार्थी पूरेसे ज्ञान प्राप्त करू शकणारन नाही. त्यांच्या ग्रंथप्रेमाची परिसीमा म्हणजे अपल्या हया समृध्द आणि प्राणप्रिय ग्रंथसंग्रहासाठी राजगृह उभारले.

    बाबासाहेबांच्या ग्रंथप्रेमाबद्दल रेगे म्हणतात,डॉ. आंबेडकरांचे ग्रंथप्रेम हे विश्वविख्यात सुप्रसिध्द ब्रिटिश व्यंगचित्रकार सर डेव्हिड लो हयांनी जागतिक राजकीय पुढारी आणि इतर विख्यात स्त्री-पुरूषांची वेळोवेळी रेखाटलेली व्यंगचित्रे अत्यंत मार्मिक असत. बिट्रिश प्रधानमंत्री चेम्बरलेन हयांच्या व्यंगचित्रात त्यांची छत्री, चर्चिलचा चिरूट, गांधींची शेळी आणि चरखा आणि नेहरूंचा गुलाब हया साहचर्याच्या वस्तू हया चित्रात अपरिहार्य असत. डॉ. आंबेडकरांचे काढलेले व्यंगचित्र तर डेव्हिडनी त्यांना भेट दिले होते. त्या सभोवती पसरलेल्या पुस्तकांच्या ढिगाऱ्यात वाचत बसलेले बाबासाहेब चितारलेले होते. ग्रंथांचे साहचर्य त्यांच्या जीवनात अपरिहार्य होते. डॉ. बाबासाहेबांच्या देशभर उभारलेल्या पूर्णाकृती पुतळयात त्यांच्या हातात ग्रंथ दाखविल्याशिवाय पुतळे पूर्ण होउच शकत नाहीत.”

    डॉ. आंबेडकरांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते. दलितांचा नेता, प्रभावी वक्ता, विद्वान प्राध्यापक, चतुर मुत्सद्दी, घटनाशास्त्रज्ञ, कायदेपंडीत, द्रष्टा ग्रंथकार, शिक्षणतज्ज्ञ, धर्मप्रवर्तक अशा विविध क्षेत्रात त्यांनी प्रभुत्व आणि क्रांती प्राप्त केली. त्यांच्या या चतुरस्त्र यशाच्या मुळाशी त्यांची बहुश्रुत विद्वत्ता आणि ज्ञानतपस्या होती आणि हया विद्वत्तेचा उगम त्यांच्या निस्सीम ग्रंथप्रेमात होता.


    बाबासाहेबांनी राजगृहातील ग्रंथालयाचे विविध विभाग केले होते. अर्थशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, धर्म, कायदा, संरक्षण, राज्यशास्त्र, चरित्र आत्मचरित्र, चलन, परदेशी नीती, बालशास्त्र, भूगोल, तत्त्वज्ञान, युध्द, राज्यघटना, मानववंशशास्त्र, असे विभाग होते. याशिवाय विविध अहवाल, नियतकालिके, वृत्तपत्रे, इत्यादींसाठी स्वतंत्र खास विभाग तयार केले होते. शब्दकोश तर अनेक होते. शेल्फवर त्या त्या विषयांची नावे वळणदार अक्षरांनी चिकटवून लिहून ठेवली होती. वाचन करतांना टिपणे काढण्याची त्यांची पध्दती वेगळीच होती. वाचनाबरोबर त्यांचे चिंतनही चालत असे. त्या चिंतनात ते येवढे गढून जात असत की त्यांना हया जगाचे भानही राहत नसे. काळ, वेळ, भूक-तहान, वासना इत्यादींची मातब्बरी त्यांच्या विद्याभ्यासापुढे ते मुळीच चालू देत नसत. आणि तशी त्यांची मातब्बरी चालतही नसे.

त्यांच्या लायब्ररीत निरनिराळया शेल्फवर छोटे छोटे बोर्डस मोजक्या ठिकाणी लावून ठेवलेले होते. त्यातील काही पुढीलप्रमाणे-

1. शब्दात शहाणपण

2. विचारात श्रध्दा

3. कृतीत निश्चय असेल तर भारत महान बनू शकेल.

4. जर तुला मनुष्य बनावयाचे असेल तर स्वत:च स्वत:शी कठोर शिस्तीने वागल पाहिजे.

5. धर्म मनुष्याकरिता आहे, मनुष्य धर्माकरिता नाही.

6. सत्य हे सत्य म्हणूनच ओळखा असत्य हे असत्य म्हणूनच ओळखा.

   पुस्तकांच्या आनंदासारखा आनंद नाही हे सांगताना डॉ. आंबेडकर म्हणतात,माझ्या जीवनातील स्नेहीसोबती मी तुम्हाला देत आहे. समाजाने बहिष्कृत केलेल्या माझ्यासारख्याला या थोर ग्रंथांनीच जवळ केले. मला जगात त्यांच्याइतका परमस्नेही दुसरा कोणीही नाही. मला समाजाने दुर लाथाडले, जगापासून मी दूर झालो, साऱ्यांनी मला दुर केले परंतु या ग्रंथांनी मला आसरा दिला.. म्हणून एखादे पुस्तक दुसऱ्याला दयायचे म्हटले की माझ्या अगदी जीवावर येते. पुस्तकांच्या सहवासात शांत आयुष्य वेचण्यासारखा दुसरा आनंद नाही. पुस्तके मला शिकवतात. मला नवी वाट दाखवतात. म्हणून ती मला आनंदाचा लाभ करून देतात. 1952 साली आपला प्राणप्रिय बहुमोल ग्रंथसंग्रह त्यांनीच स्थापन केलेल्या सिध्दार्थ महाविद्यालयाला प्रदान करण्याच्या समारंभात बाबासाहेब भावनाविवश होउन बोलले होते.

मी एकदा वाचावयास बसलो की माझ्या साऱ्या शक्ती एकवटल्या जातात. मी रात्रभर वाचीत वा लिहीत बसलो तरी मला थोडासा देखील थकवा येत नाही. अविश्रांत वाचनामुळे माझी स्मरणशक्ती एवढी तल्लख आणि प्रखर झाली आहे की, अमुक ग्रंथावरील महत्त्वाचे लिखाण किंवा अमुक ग्रंथाच्या अमुक पानावर अमक्या ओळीत हे वाक्य किंवा हे अवतरण आहे हे मी अचुक सांगू शकतो.”

  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ग्रंथालयातील प्रत्येक ग्रंथ स्वत: निवडला होता. त्यामुळे त्यातील विचारधनाबरोबरच त्याचा रंग, बांधणी, आकार, वेष्टण त्यांच्या बिनचुकपणे लक्षात असत. आपले ग्रंथ त्यांना किती प्राणप्रिय होते हे स्पष्ट करतांना रेगे म्हणतात,

     त्यांनी आपले हे ज्ञानधन जीवनभर एखाद्या कृपनाप्रमाणे परदृष्टीपासून सांभाळले होते. हया ग्रंथप्रेमापोटी त्यांनी स्वत:ची उपासमार केली होती. हातात आलेला पैसा वारेमाप उधळला होता, वेळप्रसंगी उधारी, उसनवारी आणि कर्जह केले होते. खूप वर्षापूर्वी बनारस हिंदू विद्यापीठासाठी पं. मालवियांनी हा संग्रह मागितला होता आणि त्याबद्दल दोन लक्ष रूपये देउ केले होते. कालांतराने बिर्ला शेटजींनी सहा लक्ष रूपये देण्याची तयारी दर्शविली होती. पण हा ज्ञानयोगी बधला नाही. व्यवहारीक धनापेक्षा हे विचारधन त्यांनी अधिक मोलाचे मानले. ग्रंथांवर इतके अलोट प्रेम करणारा, त्यांच्या नित्यनिकट साहचर्यासाठी अहोरात्र तळमळणारा आणि त्यांच्या प्रेमाखातर घर उभारणारा जगात दुसरा कोणी विद्वान पंडित असेल काय?

संदर्भ:

1. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक चिंतन - डॉ. एस.एन. बरडे

2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र ग्रंथ, खंड 1 ते 10 - चा.भ. खैरमोडे

Read Also; Assault on Rajgruha राजगृहावर हल्ला

Post a Comment

1 Comments