Mahatma Phules Social Movement महात्मा फुलेंची सामाजिक चळवळ


Mahatma Phules Social Movement

महात्मा फुलेंची सामाजिक चळवळ

     जोतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 मध्ये झाला. महात्मा फुल्यांना सामाजिक क्रांतीचे अग्रदूत म्हटल्या जाते. शेतकरी, स्त्रीया आणि अस्पृश्य यांच्या समस्या केंद्रस्थानी माणून त्या सोडवण्यासाठी त्यांनी आजन्म संघर्ष केला. बुध्दानंतर महात्मा जोतिबा फुले यांनी वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था आणि अस्पृश्यता नाकारली होती. त्यांच्या मते, मानवामध्ये केवळ दोनच जाती निसर्गाने निर्माण केल्या आहेत त्या म्हणजे एक पुरूष आणि दुसरी स्त्री. निर्माण कर्त्याला जर भेदाभेद करायचा असता तर सगळे सारखे राहिले नसते. जातीयता आणि विषमतेचे प्रमुख कारण म्हणजे पारंपारिक धार्मिक ग्रंथ आहेत म्हणून त्यांनी धर्मग्रंथ आणि प्रस्तापितांच्या दैवीकरणाला नाकारले होते. जनार्धन वाघमारे म्हणतात. जातीय विषमता हा हिंदू धर्माचा आधार असल्यामुळे म. फुले हिंदू धर्माला कैदखाना म्हणतात. या विषमतेमुळे हिंदुस्तान राष्ट्र बनू शकला नाही. विषमता ही श्रध्दा आणि अंधश्रध्देमुळे समाजात रूजली आहे. अंधश्रध्दा निर्मुलनासाठी समाज सुशिक्षित असला पाहिजे. असे त्यांचे मत होते.

     महात्मा फुले प्रस्तापित व्यवस्थेविरूध्द ऐवढे आक्रमक का झाले? महात्मा फुले आपल्या ब्राम्हण मित्राच्या लग्नासाठी गेले होते. रस्त्याने नवऱ्या मुलाची मिरवणूक चालली होती. ते सुध्दा त्या मिरवणूकी सोबत चालले होते. चालता चालता त्यांचा वेश पाहून एका ब्राम्हणाने त्यांना हटकले. तु कोण आहेस? या मिरवणूकीत कसा आलास?, तु शुद्र आहेस आणि तुझ्यामुळे मिरवणूक अपवित्र होईल आणि लग्नात विघ्न येईल म्हणून ब्राम्हणांनी जोतिरांवांना मिरवणूकीतून हाकलून दिले. लग्नाला आल्याचा जोतिरावांना खुप पश्चताप झाला. माझ्या सारख्या शिकल्या सवरलेल्या व्यक्तीसोबत हे लोक ऐवढया तुच्छतेने वागत असतील तर अस्पृश्यांसोबत कसे वागत असावे. या विचाराने महात्मा फुले पेटून उठले आणि त्यानी प्रस्तापित व्यवस्थेविरूध्द दंड थोपटले.

      अस्पृशांचा आणि स्त्रीयांचा उध्दार करणे हे कार्य हाती घेवून सर्वप्रथम त्यांनी 1852 मध्ये वेताळ पेठेत  अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केली. त्यासाठी त्यांनी कुणाचेही सहकार्य घेतले नाही. 1853 मध्ये त्यांनी महार, मांग इ. लोकांना विद्या शिकविण्यासाठी एक संस्था स्थापन केली. अस्पृश्यांना सार्वजनिक विहिरीवरून पाणी भरू दिले जात नाही म्हणून त्यांनी 1868 मध्ये आपल्या घराजवळचा पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला या मुळेच त्यांना कर्ते समाजसुधारक म्हणतात. म. फुलेंचा वर्णव्यवस्था, जातीव्यवस्थेला विरोध होता. विषमता दुर करण्यासाठी आणि अस्पृश्यांचा सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक विकास होण्यासाठी त्यांनी ब्रिटिशांना आरक्षणाची मागणी केली. सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकात महात्मा फुले म्हणतात. स्त्री-पुरूष हे जन्मताच स्वतंत्र व एकंदर सर्व अधिकाराचा उपभोग घेण्यास पात्र आहेत. सर्व स्त्री-पुरूषास धर्म व राजकीय स्वातंत्र आहे. सर्व मानव स्त्री-पुरूषास एकंदर धर्मासंबंधी गावकी अथवा मुलकी अधिकाराच्या जागा त्यांच्या योग्यतेनुसार मिळवण्यास ते समर्थ आहेत.

     1882 मध्ये म. फुल्यांनी हंटर कमिशन समोर सर्व मुला-मुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे करावे तसेच सर्व आदिवासी मुलांनाही शिक्षण दयावे अशी मागणी केली होती. सर्वप्रथम महात्मा फुलेंनी शिक्षणाचे महत्त्व जाणले होते. म्हणून त्यांनी शिक्षणाचा पुरस्कार केला. गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड या ग्रथांच्या माध्यमातून समाजातील वाईट रूढी, परंपरावर सडकून टिका केली.

     महात्मा फुलेंच्या पत्नी सावित्रिबाई फुले यांनी त्याना आयुष्यभर साथ दिली. सावित्रीबाईंच्या पोटी संतान नव्हती. पण त्या बद्दल त्यांना कधीही वाईट वाटले नाही. पोरकी, निराश्रित मुले, छोटी अर्भके हेच त्यांची खरीखुरी संतान होती. ज्योतिरावांनी सुरू केलेल्या बालहत्त्या प्रतिबंधक गृहातील पोरकी मुले हेच त्यांचे वारसदार होते. काशीबाई या ब्राम्हण विध्वेच्या पोटी जन्माला आलेल्या यशवंतला वाढवल, लहानाच मोठ केल. त्याला डॉक्टर बनविले. स्त्रीमुक्ती आंदोलनासाठी महात्मा फुले यांनी सुरूवात केली तेंव्हा सावित्रिबाई आपल्या पतीच्या पावलावर पाउल ठेवून स्त्री शिक्षण, स्त्रीयांची उन्नती आणि स्त्रीमुक्ती लढयासाठी स्वता: ला वाहून घेतले. जोतीरावांनी शाळा सुरू केल्यानंतर मुलींना शिक्षण देण्यासाठी त्यांनी सावित्रीबाईची शिक्षिका म्हणून नेमनुक केली. त्याकाळात मुलींना शिक्षण देणे वर्ज होते. सावित्रीबाई मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जात तेंव्हा रस्त्याने लोक त्यांच्या अंगावर शेण फेकत, दगडे मारत अशा अनेक हाल अपेष्टा त्यांना सहन कराव्या लागल्या. परंतु त्यांनी मुलींना शिक्षण देण्याचा वसा सोडला नाही.

     महात्मा फुलेंचे विचार म्हणजे मानवमुक्तीचा जाहिरनामाच होता. त्यांच्या परिवर्तनवादी विचार आणि कृतीमुळे भारतीय समाजामध्ये मुलभूत परिवर्तन होण्यास मदत झाली.


Post a Comment

1 Comments