र.धो.कर्वे (R.D.Karve) खटला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर


र.धो.कर्वे (R.D.Karve) खटला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    र.धो.कर्वे (R.D.Karve)  यांच्या समाजस्वास्थ मासिकातीलव्यभिचाराचा प्रश्न’ या लेखाच्या आधारे त्यांच्यावर 1931 मध्ये खटला भरण्यात आला.

र.धो.कर्वें हे पुरोगामी आणि बुध्दिप्रामाण्यवादी होते. व्यभिचाराचा प्रश्न, समागमन, कामवासना, स्त्रीयांचे आजार याविषयावर खुलेपणाने बोलत आणि त्यांच्या मासिकातून लिहित हे कर्मठ सनातन्यांना आवडत नसल्याने त्यांनी अनेक वेळा र.धो. कर्वेंच्या विरोधात कोर्टात खटले दाखल केले.
   21 व्या शतकामध्ये सुध्दा या विषयावर लोक खुलेपणाने बोलत नाही. मात्र र.धो. कर्वे 1931 मध्ये हे विषय खुलेपणाने मांडत असल्याने बाबासाहेबांना त्यांच नवल वाटे. सनातन्यांनी कर्वेवर दाखल केलेल्या एका खटल्यामध्ये बाबासाहेबांनी त्यांची बाजू न्यायालयात मांडली होती. त्यामध्ये संपूर्ण व्यवस्थाच ही प्रस्तापितांच्या बाजूने असल्याने तो खटला ते हरले होते. मात्र त्याकाळात बाबासाहेबांनी र.धो.कर्व्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी होवू नये म्हणून केलेले सहकार्य किती महत्त्वपूर्ण होते. बाबासाहेबांच व्हिजन किती मोठ होत आणि ते आजच्या काळासाठी किती तंतोतंत लागू पडते. याची स्पष्ट कल्पना येते.

     र.धो.कर्वे (R.D.Karve) हे स्त्री उध्दाराचे कार्य करणारे समाजसुधारक धोंडो केशव कर्वे हयांचे सुपूत्र. ते गणिताचे प्राध्यापक होते. मात्र ते आपला प्राध्यापकीच्या व्यवसायासोबत समाजप्रबोधनाचे काम करीत असत. ज्या काळामध्ये लैंगिकता, समागमन, कामवासना याविषयी कल्पना करणे वाईट होते. त्याकाळामध्ये र.धो.कर्वे हे परखडपणे आपल्या समाजस्वास्थ्य मासिकामधून मते मांडत. आजही आपल्या समाजामध्ये असे प्रश्न अतिशय हलक्या आवाजामध्ये बोलले जातात. कर्वे हे त्याकाळी मुक्तपणे बालत असत. समाजस्वास्थ्य मासिक हे लैंगिकशिक्षणासाठी कर्वेनी सुरू केले होते. समाजाचे आरोग्य चांगले रहावे, हयासाठी कर्वे लैंगिकतेबाबत लोकांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे देत. तसेच अश्लीलता आणि नैतिकतेवर आधुनिक भूमिका मांडत. कारण याविषयावर दुसरीकडे कुठे बोलण्याची सोय नव्हती. आणि ती आजही नाही. त्यामुळे लोक यामासिकाच्या माध्यमातून खुलेपणाने र.धो.कर्वेंना प्रश्न विचारत आणि कर्वे त्यांच्या प्रश्नांना शास्त्राच्या आधारे उत्तरे देत असत.

     या असल्या विषयामुळे धर्म बुडेल, आर्यवंश नष्ट होईल, समाजामध्ये अनागोंदी माजेल म्हणून सनातन्यांनी र.धो.कर्वेंच्या विरोधामध्ये अनेक वेळा खटले दाखल केले. त्यामुळे त्यांना मोठयाप्रमाणात कोर्टकचेऱ्या कराव्या लागल्या. त्याकाळचे राजकीय सामाजिक नेतृत्व प्रगल्भ नव्हते आणि कर्वेंचा विषय समजून घेण्याची उदारता एकाकडेही नव्हती. त्यामुळे र.धो.कर्वेंच्या वाटयाला एकाकीपणा आला. मात्र ते समाजातील कधिही बोलल्या गेलेल्या विषयावर आयुष्यभर लिहित राहिले आणि समाजाचे प्रबोधन करीत राहिले.

     र.धो.कर्वेवर (R.D.Karve) पहिला खटला दाखल झाला तो सप्टेंबर 1931 मध्ये समाजस्वास्थ्य मासिकातीलव्यभिचाराचा प्रश्न’ लेख लिहिल्याबद्दल इंडियन पिनल कोडच्या कलम 292 नुसार अश्लीलतेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. सरकारी वकिलाचे आशिल अहिताग्नी राजवाडेंनी कर्वेवर आरोप केला की, व्यभिचाराचा प्रश्न या लेखात कर्वे म्हणतात की, विवाह संस्था ही मंत्र म्हणणाऱ्या भटांची मक्तेदारी आहे. नाहितर विवाह म्हणजे स्त्री आणि पुरूषाला समागमास मान्यता देणे येवढाच त्याचा उद्देश आहे. एकनिष्ट राहणाऱ्या पत्नीपेक्षा वेशा बरी, असेही ते म्हणतात. कुंती, पांडव, कृष्ण याचे या लेखात दाखले देवून भावना दुखावल्या आहेत. न्यायधिशांनी कर्वेला मते मांडण्यास वेळ दिल्यावर ते म्हणाले की, राजवाडेंना विचार की कामवासना मंगलमय आहे की नाही. खजुराहोतील नग्न शिल्पातील स्त्री पुरूषांकडे हे विवाहाचे प्रमाणपत्र मागणार की काय. ज्या गोष्टीमुळे आपल्या सगळयांची सकल मानव जातीची निर्मिती झाली ती गोष्ट घाणेरडी, पापमय कशी असेल. धर्माचा सगळयात मोठा प्रतिस्पर्धी म्हणजेकाम’. कामवासनेचे आकर्षण माणसाला धर्माच्या उल्लंघनाचे सामर्थ्य देते म्हणून धर्माच्या ठेकेदारांच ‘काम’ या गोष्टीवर विशेष राग आहे. म्हणून ते कामाला पाप समजतात. यावर न्यायाधिश इंद्रवदन मेहता न्याय देतांना म्हटले, कायदयात अश्लीलतेसंबंधी व्याख्या नाही. मात्र न्यायमुर्ती कॉकबर्न यांची व्याख्या न्यायालयाने मान्य केलेली असून लिखान, चित्र किंवा कोणतीही अभिव्यक्ती ही ज्याच्या हातात पडेल ती व्यक्ती अनीतीग्रहणशिल असेल म्हणजे याद्वारे तीचे मन बिघडण्यासारखे असेल तर ते लिखान अश्लील मानावे असा प्रघात आहे. कुंती, पांडव, कृष्ण यांची निंदा करण्यात आणि पतीव्रतांची वेश्यासोबत तुलना करण्यात, मुक्त समागमाचा पुरस्कार करण्यात भारदस्तपणा नाही. त्यामुळे आरोपीवर 4 एप्रिल 1932 रोजी गुन्हा सिध्द होवून त्याला 100 रू. दंड ठोठावण्यात येत असल्याचे म्हटले. एकंदरीत काय तर धर्माच्या ठेकेदारांना आधुनिक विचार मान्य नसल्याने आणि संपूर्ण व्यवस्थाच त्यांच्या हाती असल्याने र.धो.कर्व्यांनी त्यांच्या लिखानातून वास्तव सत्य मांडले तरीही त्यांना शिक्षा देण्यात आली. त्यानंतरही र.धो.कर्व्यांनी आपले समाजसुधारणेचे काम थांबवले नाही.

  डॉ. आंबेडकर आणि कर्व्यांचा खटला:

   र.धो.कर्वें (R.D.Karve) समाजप्रबोधन, सामाजीकस्वास्थ्य, लैंगिक शिक्षण यावर लिहित राहिले त्यामुळे कर्मठ सनातनी त्यांच्या पाठीमागेच लागले. त्यांच्यावर वेळोवेळी न्यायालयात खटले भरण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हया सर्व गोष्टीवर लक्ष ठेवून होते. कर्वेंच्या आधुनिक विचारांमुळे सामाजिक परिवर्तनास मदत होईल याची त्यांना जाणीव होती. त्यामुळे त्याकाळामध्ये बाबासाहेब कर्वेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. डॉ. आंबेडकर उच्चविद्याविभूषीत वकिल असल्याने कर्वेंना आपली केस बाबासाहेबांनी लढावी अशी अपेक्षा होती म्हणून ते डाँ. आंबेडकरांना भेटण्यासाठी गेले. क्षणाचाही विचार करता बाबासाहेबांनी कर्व्यांचा खटला लढवण्यास सम्मती दिली. कर्वेंचा खटला घेवू नये म्हणून बाबासाहेबांना कर्मठ सनातन्यांकडून अनेक धमक्या आल्या मात्र त्या धमक्यांना बाबासाहेबांनी भिक घातली नाही. आणि कर्व्यांच्या पाठीमागे पर्वतासारखे उभे राहिले.

काय होता खटला?

     1933 मध्ये र.धो.कर्व्यांना पुन्हा अटक झाली. कारण होते गुजराती समाजस्वास्थ्य मासिकाच्या आवृत्तीमध्ये वाचकांच्या प्रश्नाला कर्वेंनी दिलेली उत्तरे. ही सर्व प्रश्न वैयक्तिक स्वरूपाची होती. ज्याविषयी लोक एकमेकाबद्दल स्पष्ट बोलू शकत नव्हती आणि आजही बोलू शकत नाहीत. ती प्रश्न वाचकांनी कर्वेंना विचारली आणि कर्वेंनी त्याची शास्त्रीय भाषेत उत्तरे दिली. प्रश्न होते हस्तमैथून आणि समलैंगिकता यावर. या प्रश्नांना आणि उत्तरांना अश्लील ठरवून कर्वेंच्या विरोधात इंडियन पिनल कोड सेक्शन 292 नुसार सनातन्यांनी खटला भरला. यावेळी मात्र कर्वे हे एकटे नव्हते तर त्यांच्यासोबत होते एक विधिज्ञ, उच्च शिक्षित वकिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी कोर्टात युक्तीवाद करतांना म्हटले.माझ्या अशिलाने न्यायालयासमोर समाजस्वास्थ्याविषयी जे निवेदन दिले आहे. ते अतिशय योग्य आहे. समाजस्वास्थ्य मासिक काढण्यामागे पैसा कमावने हा कर्वेंचा हेतू कधीही नव्हता तर लोकशिक्षणाचा उद्देश होता. प्रश्न वाचकांनी विचारले आहेत. वाचकांनी काय प्रश्न विचारावे हे आपण ठरवू शकत नाही. एका बाजूला नैसर्गिक भावना आणि दुसऱ्या बाजूला नीती, अनीती यातील द्विधा यांच्या कोंडीत सापडलेला आपला समाज आता प्रश्न विचारतोय हे प्रगतीचे लक्षण आहे.” माणसाच्या मनात स्वत: च्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याविषयी प्रश्न असतात मात्र ते कोणाकडे बोलू शकत नाहीत. त्या प्रश्नांची उत्तरे दुसऱ्यांकडून मिळू शकत नाही. त्यामुळे हे लोक आपआपल्या परीने उत्तरे शोधतात. परंतु या विषयाच्या अज्ञानामुळे त्यांना योग्य उत्तर मिळत नाही. अशा अवस्थेमध्ये प्रा. कर्वे हे जर अशा लोकांना शास्त्रीय पध्दतीने उत्तरे देवून त्यांच्या शंका दुर करीत असतील तर त्यांचे चुकले कुठे. लैंगिक शंका म्हणजे विकृत भावना आहे असे न्यायधिश म्हणाले. तेंव्हा बाबासाहेब म्हणतात, पण ही विकृती ज्या अज्ञानातून उगम पावते त्यावर ज्ञान हाच उतारा आहे. समलैंगिकता हे नैसर्गिक आकर्षण असून त्यात आश्चर्य वाटण्याचे किंवा द्वेष वाटण्याचे काही कारण नाही असे वाचकाच्या प्रश्नाला कर्वेंनी दिलेल्या उत्तरावर न्यायधिशांनी आक्षेप घेतला. न्यायधिशांच्या मते, हे उत्तेजन असून, समलैंगिकता हे अस काही नसतच. तेंव्हा बाबासाहेबांनी त्यांना याविषयावर सखोल विचार मांडणारे तज्ज्ञ हॅवलॉक एलिस यांचा हवाला दिला. हॅवलॉक एलिसनेस्टडीज एन सायकोलॉजी’ या पुस्तकामध्ये समलैंगिकता आकर्षणाबाबतचे विचार मांडलेले आहेत. जर जगामध्ये अशा विचारांचे पुस्तके वाचायला बंदी नाही मग कर्वेंच्या मासिकावर बंदी का. लैंगिक लिखान आहे म्हणजे ते अश्लील आहे, खरे तर अशा प्रकरणामध्ये भाषा अश्लील आहे का नाही हे ठरवायला हवे. ते ठरवता खटले भरले. त्यामुळे समाजस्वास्थ्य, लैंगिक शिक्षण यासारख्या विषयावर लिहायला, बोलायला कोणीही पुढे येणार नाही. म्हणून कर्वेची अश्लीलतेच्या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात यावी.

    मात्र हा खटला बाबासाहेब हरले. शेवटी काय या निकालामध्ये कर्मठवृत्ती दिसून आली. निकालावर निर्णय देतांना न्यायधिश म्हणाले की, कर्वेंनी हस्तमैथून, समलैंगिकता इ. प्रश्नांना उत्तरे दायला नको होती. अजूनही त्यांच्यामध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही म्हणून त्यांना रू. 200 दंड आकारण्यात आला आहे. आणि तो भरल्यास 2 आठवडे सक्त मजूरीची शिक्षा ठोठावण्यात आली.

 बाबासाहेबांनी अश्लीलतेचा खटला का स्विकारला:

    समाजस्वास्थ्य नाटकाचे लेखक प्रा. अजित दळवी म्हणतात, बाबासाहेबांचा लढा हा व्यक्तीस्वातंत्र्याचा लढा होता. व्यक्तीला स्वातंत्र्य नाकारणाऱ्या मनुस्मृतिचे त्यांनी 1927 मध्ये दहन केले. जीथे जीथे व्यक्तीस्वातंत्र्यावर बंधने आली तीथे तीथे बाबासाहेब खंबीरपणे उभे राहिले आणि लोकांना न्याय मिळवून दिला. अनेक लोक बाबासाहेबांना दलितांचे नेते म्हणून हिनवतात ते बरोबर नाही. ज्या ज्या वेळी व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी झाली. मग ती कोणत्याही समाजातील व्यक्तीची असो त्याच्या पाठीसी बाबासाहेब उभे राहिले. कर्वेंचा लढाही त्यातलाच असल्याने बाबासाहेब कर्वेंच्यापाठीसी खंबिरपणे उभे राहिले. अमेरिका युरोपमध्ये बाबासाहेबांचे शिक्षण झाले होते. भारतातील अनेक उदारमतवादी चळवळींचा प्रभावही त्यांच्यावर होता. विवेक आणि बुध्दिप्रामाण्याबाबत कर्वे लिहित ते डाँ. आंबेडकरांच्या लिखाणात आणि कृतीत अखेरपर्यंत दिसते. त्यामुळेच समाजाच्या फायदयासाठी कर्मठ सनातन्यांच्या विरोधात जीवाची पर्वा करता बाबासाहेबांनी लढा दिला.

Post a Comment

0 Comments