Remove the Statue of Manu मनुचा पुतळा हटवा
Remove the Statue of Manu 

मनुचा पुतळा हटवा

     अमेरिकेमध्ये जॉर्ज फलॉयड याची पोलिसांनी पायाखाली गळा दाबून हत्त्या केली. त्यानंतर संपूर्ण अमेरिकेमध्ये कृष्णवर्णीय लोकांनी रस्त्यावर येवून वंशद्वेषा विरूध्द तीव्र आंदोलन छेडले. पोलिसांना सर्व कृष्णवर्णीय नागरिकांची माफी मागावी लागली. शेवटी ज्या पोलिसांनी हे कृत्य केले त्यांना तीथल्या सर्वोच्य न्यायालयाने तुरूंगवास ठोठावला. ऐवढयाने कृष्णवर्णीयांचे आंदोलन थांबले नाही तर त्यांने तीव्ररूप धारण करून युरोपातील सर्वच देशामध्ये जिथे जिथे वंशद्वेषाचे समर्थन करणारे आणि वंशद्वेषाला खतपाणी घालणारे सिंबॉल, पुतळे आहेत ते फोडण्याचे काम सुरू केले. त्याचाच एक भाग म्हणून ब्रिटनमधील गुलामांचा व्यापारी रॉबर्ट मिलिगन याची मुर्ती वेस्ट इंडिया क्वाय मधून हटवण्यात आली. रॉबर्ट मिलिगनकडे जमैका मध्ये मोठ-मोठाले फार्म होते आणि तेथे तो गुलामांना ठेवून त्यांच्याकडून अमानुषपणे कामे करून घेत असे. ब्रिस्टल शहरातील प्रदर्शनकारी लोंकानी गुलामांचा व्यापारी एडवर्ड कोलस्टोन याचा पुतळा तोडला. हे करण्यात केवळ कृष्णवर्णीय पुढे नव्हते तर त्यांच्या सोबत श्वेतवर्णीय पण होते. नंतर टावर हेमलेटस काउंसिलने रॉबर्ट मिलिगन चा पुतळा हटवण्याचा निर्णय घेतला. पश्चिम इंग्लंड मधील रॉबर्ट क्लाईव्ह ची मुर्ती हटवण्यासाठीही ऑनलाईन याचिका आणि आंदोलने होत आहे. रॉबर्ट क्लॉईव्हने भारतामध्ये ब्रिटिशांचा अंमल असतांना येथील अमाप संपत्ती लुटून ब्रिटिश राजवटीस दिली. याबद्दल त्याला अनेक पुरस्कार मिळाले. परंतु त्याचबरोबर स्वत: प्रचंड संपत्ती बळकावल्याबद्दल त्याच्यावर ब्रिटिश संसदेमध्ये खटला चालवण्यात आला. ब्रिटन मध्ये आज रॉबर्ट क्लॉईव्हची मुर्ती काढण्यासाठी आंदोलन सुरू झाले आहे.

     भारतात जातीयद्वेष, वंशद्वेष, धर्मद्वेष पसरवणारे अनेक सिंबॉल, पुतळे आणि मुर्त्या आहेत. त्यांना नष्ट करण्याची वेळ आलेली आहे. त्यातुनच राजस्थान उच्च न्यायालयासमोरील मनुचा पुतळा हटवण्यासंबंधी तीव्र आंदोलन जोर धरू लागले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 23 डिसेंबर 1927 मध्ये महाड येथे मनुस्मृती जाळली. चातुर्वण्य, अस्पृश्यता, जातीयवाद, अमानवता, उचनिचता यांनी खचाखच भरलेला ग्रंथ नष्ट केल्याशिवाय या देशात समता प्रस्तापित होणार नाही असे बाबासाहेबांना वाटत होते, माणसाला पशू आणि पशुंना पवित्र माणनारी मनुस्मृती या देशात असता कामा नये. हजारो वर्षापासनू एकाच वर्गाची मक्तेदारी निर्माण करणारा ग्रंथ पवित्र असू शकतो काय? असा प्रश्न ते प्रस्तापितांना विचारतात. मनुस्मृतीने या देशाचा सत्यनाश केला आहे म्हणून त्यांनी मनुस्मृती जाळली. मनुस्मृतीच्या समर्थकांकडून आजही या देशामध्ये दलित, आदिवासी आणि महिला यांच्यावर मोठया प्रमाणात अत्याचार केले जातात. स्त्रीयावर बलात्कार केले जातात, त्यांचे अपहरण केले जाते, त्यांना मारून टाकल्या जाते. अशाप्रकारे समाजामध्ये जातीयता आणि विषमता निर्माण करणाऱ्या ग्रंथाचा लेखक हा मनु होता. मनुस्मृति ही मानवतेच्या विरोधी आहे. मनुस्मृतीच्या समर्थकांना आपले वर्चस्व आबाधित राखण्यासाठी मनुची वेळोवेळी गरज पडते.

     28 जुन 1989 रोजी राजस्थानच्या उच्च न्यायालयासमोर मनुचा पुतळा उभारण्यात आला. मानवतेच्या विरूध असणाऱ्या मनुचा पुतळाउभारण्याची जनसामान्यांची मागणी नव्हती तर काही पांखडी लोकांनी आपले वर्चस्व अबाधित राखण्यासाठी मनुच्या पुतळयाची उभारणी केली. सुरूवातीपासून शेवटपर्यंत पुतळयाच्या उभारणीचे कार्य अतिशय गोपनिय पध्दतीने करण्यात आले. त्यामुळे त्याला कुणाचाही विरोध झाला नाही. उच्च न्यायालयासारख्या संवैधानिक संस्थासमोर अशा पध्दतीचा पुतळा उभारणे खेदजनक आहे. ज्या न्यायव्यवस्थेकडून आपण सामाजिक न्यायाची अशा करतो. त्याच न्यायालयातील लोक जर मानवतेच्या विराधी असणाऱ्या मनुचे समर्थक असतील तर त्यांच्याकडून न्याय मिळेल कसा.

     दलित महिला संघटनांनी केलेल्या आंदोलनामुळे 27 जुलै 1989 मध्ये राजस्तान उच्च न्यायालयाच्या एका खंडपिठाने 48 तासाच्या आत हा पुतळा हटवण्याचे निर्देश दिले. याविरोधात विश्व हिंदू परिषदेचे नेते आचार्य धर्मेंद्र ने न्यायमुर्ती महेंद्र भूषण यांच्या बेंचकडे एक रिट पिटीशन टाकली. आणि न्यायालयाने स्टेआर्डर दिला. आणि याचा परिणाम म्हणून मनुचा पुतळा आजही राज्यस्थान उच्च न्यायालयासमोर उभा आहे.

     भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 13 नुसार कोणत्याही जुन्या रूढी, परंपरा, कायदे हे जर मुलभूत अधिकारच्या विरोधी असतील तर ते घटनेचे उल्लंघन मानन्यात येईल ते रद्दबातल ठरवण्यात येईल. मनुचा कायदा म्हणजे मनुस्मृति ही मुलभूत अधिकाराच्या विरोधी असून ती Right to Equality, Right to Freedom, Right against exploitation, Right to freedom of religion, Right to Education and Cultural Right यांच उल्लंघन करते. त्यामुळे मनुस्मृती मनु या दोघांनाही नष्ट करणे कायदयाने बंधनकारक असतांना आजही मनुचा पुतळा हा उच्च न्यायालयासमोर उभा असणे हा भारतीय संविधानाचा अपमान आहे.

     संपूर्ण युरोपमध्ये वंशद्वेषा विरोधी आंदोलन सुरू असतांना भारतामध्ये जातीयता ही वंशद्वेषापेक्षाही अमानुष असतांना केवळ दलित संघटनाच या आंदोलन करतांना दिसत आहे. मात्र यामध्ये सर्वच समविचारी लोकांनी सहभागी होणे गरजेचे आहे. ज्या ज्या लोकांना समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता हवी आहे त्यांनी विरोध नोंदवायला हवा. याच काळामध्ये औरंगाबादच्या दोन रणरागींनीनी राजस्थानमध्ये जावून मनुच्या पुतळयाला काळ फासले.   माझा त्या माताभगीनींना सलाम आहे. आज प्रगत देशामध्ये वर्णद्वेष, वंशद्वेष याला थारा नाही. जर व्यक्तीला प्रगती करायची असेल तर त्याला आपसातील हे सर्व द्वेष उखडून फेकावे लागतील आणि मानवतेची कास धरावी लागेल. तरच संपूर्ण मानवजातीचे कल्याण होईल.

     केवळ राजस्तानमधील जयपूर उच्च न्यायालयासमोरचा मनुचा पुतळा हा एकच नाही तर या देशात असे अनेक पुतळे, मुर्त्या आणि सिंबॉल आहेत जे पाहिल्यानंतर व्यक्तीच्या मनामध्ये द्वेषाची भावना निर्माण होते. ते सर्व उध्वस्त करण्याची वेळ आलेली आहे. त्यासाठी या देशातील सर्व लोकशाही समर्थकांनी एकत्र येवून प्रस्तापितांचे षडयंत्र हाणून पाडले पाहिजे.

 


Post a Comment

1 Comments