लोकशाही वाचवण्यासाठी काय कराल? डॉ. आंबेडकरांनी सांगितलेले उपाय


लोकशाही वाचवण्यासाठी काय कराल? डॉ. आंबेडकरांनी 

सांगितलेले उपाय

 जगातील सगळयात मोठी लोकशाही (Democracy) म्हणून भारताला मान मिळालेला आहे. मात्र आज देशामध्ये वेळोवेळी लोकशाहीची हत्त्या होत असतांना दिसते. राज्यकर्ते आपल्या सोयीनुसार लोकशाहीचा अर्थ लावत आहेत. आणि खरी लोकशाही बाजूला ठेवून लगाम नसलेल्या घोडयासारखे कुठेही उधळत आहे.

राजस्थान, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यामध्ये सत्ताप्रस्तापित करण्यासाठी आमदारांना विकत काय घेतात, काही लोकांसाठी राज्यपाल अर्ध्यारात्री शपथविधी काय देतात, विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे घोंगडे भिजत काय ठेवतात, राज्यअस्थिर करण्याचा प्रयत्न काय करतात. हे सगळ लाजिरवाने आणि हा देश हुकूमशाहीकडे तर चालला नाहीना. अशी शंका मनात आल्याशिवाय राहत नाही. ज्या लोकांना संविधान, लोकशाही याचे कोणतेही ज्ञान नाही असे लोक लोकशाही राबवत असतील तर देशाचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही.
   आज त्याचाच परिणाम आपण पाहत आहोत की, देशाला स्वातंत्र्य मिळून 73 वर्षे पूर्ण झाली. देशाची सत्ता केवळ एका वर्गाच्या हाती होती आणि आजही आहे तरी देशाचा विकास झाला नाही. देशात स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुत्व प्रस्तापित झाले नाही. त्यांचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी घटनेला आरक्षणाला दोष देवून ते संपवण्याचा सतत प्रयत्न करत आहेत. दोन धर्म, जाती यामध्ये भांडणे लावून आपली सत्ता टिकवून ठेवण्यापूरते काम करीत असतात. भारतीय लोक बिचारे मेंढरा प्रमाणे मुके बिचारी कुठेही हाका प्रमाणे सत्तेत असलेली लोक त्यांचा फायदा घेतात. शेतकरी आत्महत्त्या, गरीबी, बेकारी, बेरोजगारी, बलात्कार, दलितांवर अत्याचार ही सर्व संकटे मुळासकट उखडून फेकण्याची कुणातही हिम्मत नाही. या देशाच दुर्भाग्य की, अतिशय संकुचित विचाराचे राज्यकर्ते या देशाला लाभले. या देशामध्ये लोकशाही प्रस्तापित करणाऱ्या आणि तीची रूजवणूक करणाऱ्यापूर्वजांना पुढील पिढीकडून खुप मोठया अपेक्षा होत्या मात्र त्या सगळया धुळीला मिळाल्या आहेत.

  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 22 डिसेंबर 1952 मध्ये लोकशाहीवर आपले विचार स्पष्ट केले, त्यामध्ये ते म्हणतात, लोकशाहीचे (Democracy) स्वरूप आणि उद्देश देशकालपरत्वे बदलत असतात. प्राचीन ग्रीक अथेनियन लोकशाहीमध्ये जवळपास निम्मे लोक गुलाम होते. आधुनिक लोकशाहीमध्ये गुलामांच्या संकल्पनेला स्थान नाही. तसेच एकाच देशामध्ये एकेकाळी तिचे एक वेगळे स्वरूप असते तर दुसऱ्या काळामध्ये काही वेगळेच, आजची आधुनिक लोकशाही पूर्वीची लोकशाही यामध्ये फरक आहे. जसे इंग्लंडमधील 1688 पूर्वीची लोकशाही आणि नंतरची लोकशाही यामध्ये खूप अंतर आहे. लोकशाहीच्या उद्देशाप्रमाणे तीचे उद्देश देखील बदलत असतात. सध्याच्या लोकशाहीचा उद्देश निश्चितच लोककल्याणाचे कार्य करण्याचा आहे.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या (Dr.Ambedkar) मते, लोकशाही (Democracy) म्हणजे शासनाचा असा एक प्रकार ज्यामध्ये रक्ताचा एक थेंबही सांडता लोकांच्या आर्थिक सामाजिक जीवनामध्ये क्रांतीकारी बदल घडवून आणला जातो. आधुनिक लोकशाही जनतेच्या संमतीवर आधारलेली आणि लोककल्याण साधणारी आहे. लोकांनी ज्यांच्या हाती कायदेशिर सत्ता दिली आहे त्यांनी जनतेच्या सामाजिक आर्थिक जीवनात लोककल्याण साधण्यासाठी परिवर्तन आणण्याचा प्रयत्न करावा. कुठल्याही रक्तपाताशिवाय केलेल्या परिवर्तनाचे जनता स्वागत करते. शासनाविरूध्द काही मतभेद असल्यास ते शांततेने घटनेच्या चौकटीतच सोडवायला हवे. विरोधासाठी विरोध करता चर्चेतून वाटाघाटीतून मतभेद दुर करायला हवे. लोकशाही यशस्वी करण्यासाठी डॉ.आंबेडकरांनी काही उपाययोजना सुचविल्या होत्या त्याची अंमलबजावणी जर आजच्या राज्यकर्त्यांनी केली तर लोकशाही जिवंत राहू शकते.

1. समतेची अंमलबजावणी:

   लोकशाहीच्या (Democracy) विकासासाठी समतेची आवश्यकता असते. लोकशाहीसाठी जातीप्रथा, वर्णव्यवस्था, वर्गव्यवस्था हया हानीकारक आहेत. एका वर्गाचे दुसऱ्या वर्गावर जन्माधिष्ठीत वर्चस्व असता कामा नये. एक वर्ग शोषण कर्ता दुसरा सर्वहारा असेल तर तिथे लोकशाहीचा विकास होवू शकणार नाही. दुभंगलेले घर कधिही टिकू शकणार नाही. म्हणून समाजातील निरनिराळे सामाजिक आर्थिक भेद नष्ट झाले पाहिजे. लोकशाहीमध्ये कोणालाही विशेष अधिकार मिळता कामा नये. सर्वजन कायदयासमोर समान असले पाहिजेत.

2. मजबूत विरोधी पक्ष असावा:

    लोकशाहीला यशस्वी करायचे असेल तर मजबूत विरोधी पक्ष असायला पाहिजे. सत्ताधारी पक्षाला विरोधी पक्षाची धास्ती वाटायला हवी. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्या समन्वयाने लोकशाहीचे शासन चालायला पाहिजे. विरोधी पक्ष केवळ विरोधी पक्ष असता कामा नये, तर तो पर्यायी पक्ष असायला हवा. विरोधी पक्ष खंबीर नसेल तर एका अर्थाने बहुसंख्यांकाचे अल्पसंख्यांकावर अनियंत्रित शासन चालेल त्याला लोकशाही म्हणता येणार नाही.

3. कायदा आणि प्रशासन सर्वांसाठी समान असावे:

   लोकशाहीच्या विकासासाठी कायदा आणि प्रशासन सर्वांसाठी समान असले पाहिजे. काही विशिष्ट वर्गासाठी विशिष्ट वागणूक असता कामा नये. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सर्वांना समान वागणूक दिली पाहिजे. अर्थात कायद्याचे अधिराज्य हे तत्त्व मान्य केले पाहिजे, तरच सर्वांना समान न्याय मिळेल.

4. घटनात्मक नीतीमत्तेची आवश्यकता:

    लोकशाही यशस्वी करायची असेल तर घटनात्मक नीतीमत्तेची आवश्यकता असते. घटनेने प्रस्तापित केलेले नितीमत्तेचे कठोरपणे आचरण करायला हवे. सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रात सर्वांसाठी समान न्यायाची भूमिका असावी, विचार, अभिव्यक्ती, पूजा याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य असावे. संधिची समानता यासारख्या घटनात्मक नीतीमूल्यांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. काळाच्या ओघात निर्माण झालेले संकेत पालन करणे जरूरीचे आहे.

5.  बहुसंख्यांकांचे अल्पसंख्यांकावर राज्य नसावे:

    लोकशाहीच्या विकासासाठी बहुसंख्यांकांचे अल्पसंख्यांकावर राज्य नसावे. बहुसंख्यांकानी आपल्या बहुमताच्या जोरावर अल्पसंख्यांकांना डावलू नये. त्यांच्या मताचा आदर करावा. अल्पसंख्यांकांनीही आपले मत व्यक्त करतांना सनदशीर मार्गाचा अवलंब करावा. केवळ विरोधासाठी विरोध करता तत्त्वांसाठी विरोध केला पाहिजे.

6. नीतीमान नागरिकांची आवश्यकता:

    लोकशाहीच्या विकासासाठी नागरिक नीतीमान असले पाहिजेत. कायदे व्यक्तींच्या बाहयांगाचे नियंत्रण करतात. नीती मात्र व्यक्तीच्या अंतर आणि बाहय अंगाला दोन्हीला नियंत्रित करते. लोक नीतीमान असतील तर कायद्याची कमीत कमी गरज पडते. मात्र लोक नीतीमान नसतील तर कायदे कितीही केले तरी अंमल मात्र कमीत कमी होईल. नीतीमुळे कायद्यांचे पालन होण्यास मदत होते.

7. सद्सद्विवेक बुध्दी:

   सद्सद्विवेक बुध्दी ही लोकशाहीच्या विकासासाठी आवश्यक असते. अन्याय, आणि अत्याचार, मग तो कोणाकडूनही होवो, तो दुर करण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रयत्न केले पाहिजे. सार्वजनिक सद्सद्विवेक बुध्दी म्हणजे सर्व अन्यायाविरूध्द बंड करण्याची बुध्दी होय. आपण परराष्ट्रात होणाऱ्या अन्यायाबद्दल गुपचुप बसतो हे योग्य नाही. अन्यायाविरूध्द सर्वांनी आवाज उठविणे लोकशाहीच्या विकासासाठी आवश्यक असते.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी (Dr.Ambedkar) सुदृढ लोकशाहीच्या (Democracy) विकासासाठी व्यक्त केलेले विचार अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. त्यांच्या या विचाराबद्दल क्षीरसागर म्हणतात, आपल्या देशामध्ये अनेक जाती, धर्म, भाषा, प्रांत वर्गाचे लोक आहेत. त्यांच्यामध्ये समतेची एकात्मतेची भावना नाही. आपल्या देशामध्ये जातीय बहुमत आहे जातीय अल्पमत आहे. जात स्थायी असल्यामुळे जातीवर आधारित बहुमत किवा अल्पमत देखील स्थायी राहिल. म्हणून जातीय बहुमताऐवजी राजकीय बहुमत प्राप्त करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. प्रशासन भ्रष्ट बनत चालले असून, चांगल्या प्रथांचा अभाव आहे. बहुसंख्यांकांचे अल्पसंख्यांकांवर वर्चस्व आहे. अल्पसंख्यांकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. नागरिक आपल्या हक्क कर्तव्याबद्दल जागरूक नाहीत आणि त्यांच्यामध्ये अन्यायाविरूध्द पेटून उठण्याची वृत्ती नाही. या सर्व कारणामुळे बाबासाहेब चिंताग्रस्त असत.

  आपण 1950 मध्ये नवीन घटनेचा स्विकार केला. त्या घटनेद्वारा भारत हे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकसत्ताक गणराज्य असल्याचे मान्य केले आहे. सर्व भारतीय नागरिकांना घटनेने न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व प्रदान केले आहे. घटनेने दिलेले हे उच्च आदर्श प्रत्यक्षात प्राप्त करणे कितपत शक्य होईल हया प्रश्नाचे उत्तर प्रत्येक भारतीयाने द्यायचे आहे.

संदर्भ: डॉ.बा.आ.शै.चिंतन डॉ.संजय एन बरडे

Post a Comment

0 Comments